|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टय़ात जागेच्या वादातून खून

आष्टय़ात जागेच्या वादातून खून 

आष्टा/वार्ताहर :

आष्टा येथे जागेच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेने आष्टा शहरात खळबळ उडाली आहे.

     सचिन धनाजी हजारे (वय 25) रा. बिरोबा मंदिरासमोर, आष्टा असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून आष्टा पोलिसांनी संशयित आरोपी शिवाजी नायकू माने राहणार आष्टा याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी अशोक रामचंद्र सिध्द यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    याबाबत आष्टा पोलीस ठाण्याकडून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित आरोपी शिवाजी माने याने बिरोबा मंदिरासमोरील एका हॉटेल शेजारी मोकळ्या जागेत गाळे बांधकाम सुरू केले होते. याठिकाणी सचिन हजारे याचेही एक खोके होते. दरम्यान, शिवाजी माने याने आपल्या जागेत दुकान गाळे का बांधले याचा जाब विचारण्यासाठी सचिन हजारे गेला असता यावेळी शिवाजी माने व सचिन हजारे यांच्यात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात शिवाजी माने याने सचिन हजारे याच्या कमरेच्यावर धारदार शस्त्राने वार केला. वार वर्मी लागल्याने सचिन हा जागेवरच कोसळला. सचिनचा आवाज ऐकून अशोक सिध्द हे त्याच्याजवळ गेले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. यावेळी सचिन हजारे याने जागेच्या वादातून शिवाजी माने यांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचे सांगितले. दरम्यान, याच वेळी संशयित आरोपी शिवाजी माने हा सायकलवरून नागाव रस्त्याकडे जाताना अशोक सिध्द यांना दिसून आला. या घटनेची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी सचिन हजारे यास उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयाकडे पाठवले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

   या घटनेचे माहिती वाऱयासारखी शहरात पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. मयत सचिन हजारे हा विवाहित असून त्याला आई, वडील, भाऊ एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणी अशोक सिद्ध यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आष्टा पोलिसांनी संशयित आरोपी शिवाजी माने त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास अनिल माने करीत आहेत. या घटनेने आष्टा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.