|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दीड वर्षात पेट्रोल 20 रु. ने महागले

दीड वर्षात पेट्रोल 20 रु. ने महागले 

दरवाढीच्या चढत्या आलेखाने सर्वसामान्यांच्या उरात धडकी

प्रतिनिधी / कणकवली:

सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने करणाऱया भाजपाची केंद्रात एकहाती सत्ता आल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर पाहून धडकी भरण्याची वेळ येत आहे. एप्रिल 2017 पासूनच्या 17 महिन्यांचाच विचार केल्यास पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे 20 व 19 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे एकूण महागाईत वाढ होत असल्याने ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱया वाढीचा हा परिणाम असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत असले, तरीही यापूर्वीच्या कालावधीत याचसाठी आंदोलने करणाऱया आजचे सत्ताधारी या लक्षणीय दरवाढीकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. शासनाने 15 जून 2017 पासून पेट्रोल, डिझेलचे दर दररोज निश्चित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या एकूण स्थितीचा विचार करता अपवाद वगळला, तर दर कधी कमी झालेच नाहीत.

एप्रिल 2017 मध्ये पेट्रोलचा प्रतिलिटर दर 72.50, तर डिझेलचा दर 60 रुपये होता. सप्टेंबर 2017 मध्ये हा दर अनुक्रमे 80.32 व 62.34 झाला झाला. मात्र, त्यानंतरच्या कालावधीत दरामध्ये सातत्याने टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. आज पेट्रोलचा दर 91.93, तर डिझेलचा दरही 79 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पेट्रोल डिझेलच्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असून पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंसह प्रवासभाडय़ातही वाढ झाली आहे. ही दरवाढ महागाईत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरत असल्याने सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.