|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्पेनच्या एका शहराने केला अनोखा संकल्प

स्पेनच्या एका शहराने केला अनोखा संकल्प 

2020 पर्यंत प्रत्येक व्यक्ती 8 किलोने वजन घटविणार

वृत्तसंस्था/ माद्रिद

स्पेनमधील नॅरोन शहराच्या रहिवाशांनी अनोखा संकल्प केला आहे. 2020 च्या प्रारंभापर्यंत एकूण लोकसंख्येचे 1 लाख किलो वजन घटविण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे. याकरता शहराच्या प्रत्येक तरुणाला सुमारे दीड किलो वजन कमी करावे लागणार आहे. येथील एकूण लोकसंख्या 40,000 असून यातील 9 हजार अतिस्थूल आहेत. तर 3 हजार लठ्ठपणाने त्रस्त आहेत.

लक्ष्य प्राप्त करण्यासाठी शहराच्या लोकांनी मांसाहार आणि तळलेले पदार्थ खाणे बंद केले आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी जानेवारीपासून सुरू होणाऱया ‘स्लिमिंग प्रोग्राम’मध्ये ते सामील होत आहेत. 63 वर्षीय डॉक्टर कार्लोस पिनिएरो याचे प्रणेते आहेत. 21 व्या शतकात लोक चालणेच विसरल्याचे पिनिएरो यांचे म्हणणे आहे. रुग्णांना तपासण्याऐवजी पिनिएरो कित्येकदा स्थानिक उद्यानात लोकांना व्यायामाचे लाभ सांगताना दिसून येतात.

व्यायामाची सवय

शहरातील 4 हजार जण पिनिएरो यांच्या स्लिमिंग प्रोग्राममध्ये सामील झाले आहेत. यात महापौर मॅरियन फरेरो आणि त्यांच्या सहकाऱयांचा देखील समावेश आहे. काय खावे, कोणते व्यायामप्रकार करावेत हे या कार्यक्रमात सांगितले जाते. नॅरोन शहर स्पेनच्या गॅलिसिया क्षेत्रात मोडते. स्पॅनिश सोसायटी ऑफ कार्डियोलॉजीच्या अध्ययनानुसार गॅलिसियामध्ये स्पेनच्या सर्वाधिक स्थूल लोकांचे वास्तव्य आहे.

वजन घटविण्यास यश

55 वर्षीय मारिया टेरेसा रोड्रिग्ज मैत्रिणींसोबत पायी फिरणे पसंत करतात, मार्च महिन्यात त्यांचे वजन 82 किलो होते, जे आता कमी होत 70 किलोवर आले आहे. रोज चालल्यानंतर दीड तास व्यायाम करते, शुक्रवारी नृत्य वर्गाला हजेरी लावत असून आमच्या गटात एक 80 वर्षीय महिला देखील असल्याची माहिती मारिया यांनी दिली.

रेस्टॉरंट, शाळांची मदत

शहराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी येथील 18 रेस्टॉरंटनी आरोग्यासाठी लाभदायक खाद्यपदार्थ उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. येथील शाळा देखील मुलांना वजन कमी करण्याचे धडे देत आहेत. जॉर्ज जुआन नावाच्या शाळेत 224 विद्यार्थी आहेत. काही मुले सायकलिंग करण्यासोबतच शिकत आहेत. तर काही मुलांनी शाळेला चालत किंवा सायकलने जाण्याचा निर्धार केला आहे.