|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कुडची हेस्कॉम कार्यालयाला घेराव

कुडची हेस्कॉम कार्यालयाला घेराव 

वार्ताहर/ कुडची

कुडची ग्रामीण ग्रा.पं. अंतर्गत येणाऱया विविध भागातील नागरिकांना निरंतर ज्योती योजना लागू करा. तसेच रात्रीच्यावेळी विद्युतपुरवठा सुरळीत चालू करण्याच्या मागणीसाठी हेस्कॉम कार्यालयाला घेराव घातला.

येथील कुडची उपविभागाचे कार्यनिर्वाहक अधिकारी राजेंद्र वाकपटे यांना भेटून शेतकऱयांनी आपल्या समस्या मांडल्या. यात दररोज रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत संपूर्णपणे विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे येथे राहणाऱया लोकांत भीतीचे वातावरण असून रात्रीच्या वेळी चोऱया होऊ शकतात. घरात लहान मुले, आजारी व्यक्ती, वयस्कर आहेत. सहामाही परीक्षा चालू असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण निर्माण होत आहे.

हाड जन्नू, लंगर तोटसह विविध भागात अनेक कुटुंबे राहतात. त्यामुळे निरंतर ज्योती योजना लागू करून 24 तास वीजेची सोय करण्याची मागणी करण्यात आली. लोकांच्या समस्या ऐकून घेऊन वाकपटे यांनी रात्रीचा विद्युतपुरवठा पूर्ववत करणार आहे. मात्र, शेतकऱयांनी पंपसेट चालू करू नये. एखाद्या वेळी लोड वाढल्यास समस्या निर्माण होतात. त्याबरोबर निरंतर ज्योतीचे काम अपूर्ण राहिले असून ते लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामीण भागात विद्युतपुरवठा 24 तास देण्यासाठी विशेष लक्ष देण्याचा भरवसा दिला.

यावेळी मुजाहिद पिरजाने, झाकीर बागे, नाजीम पालेगार, महाबुबपाशा रुकुंदी, ताहीर डोपरे, कल्लाप्पा नाईक, सोहेल संदरवाले, तौसिफ चमनमलिक, शहेनावाज ढंगेसह हेस्कॉमचे अन्य अधिकारी उपस्थित होते.