|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » तो आला, त्याने पाहिले, तो जिंकला!

तो आला, त्याने पाहिले, तो जिंकला! 

वृत्तसंस्था /राजकोट  :

मुंबईचा युवा सलामीवीर, तडाखेबंद फलंदाज पृथ्वी शॉने (154 चेंडूत 134) आपल्या पहिल्याच कसोटी लढतीत शानदार शतक झळकावत भारताचा पदार्पणातील सर्वात युवा कसोटी शतकवीर बनण्याचा मान प्राप्त केला. त्याच्यासह चेतेश्वर पुजारा (130 चेंडूत 86), विराट कोहली (137 चेंडूत नाबाद 72), अजिंक्य रहाणे (92 चेंडूत 41) यांनीही फटकेबाजी केल्यानंतर भारताने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 बाद 364 धावांचा भक्कम पाया रचला. सलामीवीर केएल राहुल भले शून्यावर बाद झाला. पण, त्यानंतर पृथ्वी शॉ व पुजाराची 206 धावांची द्विशतकी भागीदारी लक्षवेधी ठरली.

कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी शेवटच्या सत्रात 105 धावांची भागीदारी साकारत संघाला भक्कम स्थिती प्राप्त करुन दिली. अजिंक्य रहाणे दिवसभरातील सहा-एक षटकांचा खेळ बाकी असताना चेसच्या गोलंदाजीवर डावरिचकडे झेल देत बाद झाला. पण, तोवर भारताने आपले वर्चस्व उत्तमरित्या प्रस्थापित केले होते.

137 चेंडूत केवळ 4 चौकारांसह 72 धावांवर नाबाद राहिलेल्या कर्णधार विराट कोहलीने आणखी एका कसोटी शतकाच्या दिशेने कूच केली असून दिवसअखेरीस ऋषभ पंत (21 चेंडूत नाबाद 17) त्याच्या साथीने खेळत होता. दिवसभरात 89 षटकांचा खेळ झाला तर त्यात भारताने षटकामागे 4.08 च्या सरासरीने धावा फटकावल्या.

विंडीज कर्णधार नाणेफेकीपूर्वीच बाहेर

मुळातच कणाहीन संघ असलेल्या विंडीजला या लढतीत नाणेफेक होण्यापूर्वीच कर्णधार जेसॉन होल्डर खेळू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्याने आणखी एक जबरदस्त धक्का बसला. जलद गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल (1-66) वगळता विंडीजचा अन्य एकही गोलंदाज भारतीय फलंदाजांना अजिबात पेचात टाकू शकला नाही. विंडीजची गोलंदाजी कमकुवत होती. पण, तरीही पृथ्वी शॉच्या शतकाचे मोल यामुळे कमी होण्यासारखे नव्हते.

99 चेंडूतच पहिलेवहिले शतक

पृथ्वी शॉने आपल्या पहिल्याच कसोटीत एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे आक्रमक फलंदाजी साकारत विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच धुलाई केली. त्याचे बॅकफूटवरील फटके तर विंडीज गोलंदाजांच्या मनात आणखी धडकी भरवणारे होते. फिरकीपटूंना पाचारण केले गेले त्यावेळी तर शॉ आणखी आक्रमक झाला आणि त्यानंतर त्याचे शतक होणे ही निव्वळ औपचारिकता होती. 18 वर्षे व 329 दिवस वयाच्या शॉने 99 चेंडूतच येथे आपले पहिलेवहिले कसोटी शतक पहिल्याच लढतीत साजरे पेले. यापूर्वी, रणजी चषक व दुलीप चषक स्पर्धेतही त्याने पदार्पणातच शतक साजरे करण्याचा पराक्रम साकारला होता. यादरम्यान, शॉ हा कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर दुसरा सर्वात तरुण शतकवीरही ठरला.

उपाहारावेळी 75 धावांवर नाबाद राहिलेल्या शॉने पुढे कव्हर्सकडे पंच करत शानदार शतक झळकावले. त्याच्या निम्यापेक्षा अधिक धावा चौकारामधूनच वसूल केल्या गेल्या. या डावात त्याने 19 चौकार फटकावले. चहापानाच्या उंबरठय़ावर मात्र त्याला बाद होत परतावे लागले. येथे त्याला फारशा दर्जेदार गोलंदाजीला सामोरे जावे लागत नव्हते. पण, तरीही त्याची फटक्यांची निवड त्याचा दर्जा अधोरेखित करणारी होती. पुजाराचे 16 वे कसोटी शतक अवघ्या 14 धावांनी हुकले. पण, पदार्पणवीर शेरमन लुईसच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देण्यापूर्वी त्याचा धडाकाही लक्षवेधी होता.

भारताचा 293 वा कसोटीपटू

तत्पूर्वी, शॉ हा कसोटीत प्रतिनिधीत्व करणारा भारताचा 293 वा क्रिकेटपटू ठरला. पहिला चेंडू सोडून दिल्यानंतर दुसऱया चेंडूवर कव्हर सीमारेषेकडे पिटाळत 3 धावा वसूल केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले खाते उघडले. विंडीजचा जलद गोलंदाज गॅब्रिएल प्रतितास 140 किमी वेगाने गोलंदाजी करत होता. पण, शॉने सहज फटकेबाजी करत त्याला निष्प्रभ ठरवले. केएल राहुल मात्र इनकटरवर फसला आणि खाते उघडण्यापूर्वीच पायचीत होत त्याला परतावे लागले. शॉच्या फटकेबाजीवर याचा काहीच परिणाम झाला नाही आणि त्याने सहजसुंदर फटकेबाजी करत पुजाराच्या साथीने भक्कम पायाभरणी केली. 

धावफलक

भारत पहिला डाव : पृथ्वी शॉ झे. व गो. बिशू 134 (154 चेंडूत 19 चौकार), केएल राहुल पायचीत गो. गॅब्रिएल 0 (4), चेतेश्वर पुजारा झे. डावरिच, गो. लुईस 86 (130 चेंडूत 14 चौकार), विराट कोहली खेळत आहे 72 (137 चेंडूत 4 चौकार), अजिंक्य रहाणे झे. डावरिच, गो. चेस 41 (92 चेंडूत 5 चौकार), ऋषभ पंत खेळत आहे 17 (21 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 14. एकूण 89 षटकात 4/364.

गडी बाद होण्याचा क्रम

1-3 (केएल राहुल, 0.6), 2-209 (पुजारा, 42.6), 3-232 (पृथ्वी शॉ, 50.2), 4-337 (रहाणे, 83.3).

गोलंदाजी

गॅब्रिएल 18-1-66-1, किमो पॉल 10-1-41-0, शेरमन लुईस 12-0-56-1, देवेंद्रो बिशू 30-1-113-1, रॉस्टन चेस 16-0-67-1, क्रेग ब्रेथवेट 3-0-11-0.

Related posts: