|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » भारताचा पहिला डाव 649 धावांवर घोषित, पृथ्वी, विराट, जाडेजाची शतके

भारताचा पहिला डाव 649 धावांवर घोषित, पृथ्वी, विराट, जाडेजाची शतके 

ऑनलाईन टीम / राजकोट :

भारत-वेस्ट इंडिज कसोटीचा दुसरा दिवस विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाच्या दमदार शतकांचा ठरला. जाडेजाचे हे कसोटी क्रिकेटमधलं पहिलंवहिलं शतक आहे. विशेष म्हणजे त्याने ते आपल्या होम ग्राऊंडवर ठोकले. दुसऱया दिवशी भारतीय संघाने 9 बाद 649 धावांवर आपला डाव घोषीत केला.

या कसोटीत दोन दिवसांच्या खेळात वेस्ट इंडिजवर भारतीय गोलंदाजांचा दबाव राहिला. पदार्पणातच पृथ्वी शॉने ठोकलेले शतक, जाडेजाचे कसोटीमधील पहिलंवहिलं शतक आणि विराटचे शतक अशा तीन शतकांनी भारताचा पहिला डाव वैशिष्टय़पूर्ण ठरला. मात्र याचबरोबर भारताच्या रिषभ पंतचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं.

विराटने दहा चौकारांसह 139 धावांची खेळी उभारली. तर पृथ्वीने 154 चेंडूंत 19 चौकारांसह 134 धावा, तर रवींद्र जाडेजाने 132 चेंडूंत आपलं शतक साजरं केलं.

पण विराट कोहलीने सवयीने शतक झळकावलं. विराट आणि रिषभ पंतने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. या भागिदारीत पंतचा वाटा 92 धावांचा होता. त्याच्या 84 चेंडूंमधल्या खेळीला आठ चौकार आणि चार षटकारांचा साज होता.

विराटने सलग तिसऱया कॅलेंडर वर्षात एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने 121 वी धाव घेऊन, 2018 या कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा गाठला. त्याच्या खात्यावर वर्षभरात नऊ कसोटी सामन्यांमध्ये 1018 झाल्या धावा आहेत.