|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » 57 टक्के भारतीय कर्मचाऱयांचे उत्पन्न 10 हजारपेक्षा कमी

57 टक्के भारतीय कर्मचाऱयांचे उत्पन्न 10 हजारपेक्षा कमी 

अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अहवाल : सरकारी कर्मचाऱयांना जास्त वेतन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात आर्थिक विकास आणि औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होत असूनही कर्मचाऱयांचे वेतन त्यामानाने वाढत असल्याचे दिसत नाही. अप्ल वेतनवाढ आणि वेतनवाढ ही प्रमुख आव्हाने असूनही नियमित कर्मचाऱयांपैकी 57 टक्क्यांचे मासिक वेतन 10 हजार रुपये अथवा त्यापेक्षा कमी असल्याचे आव्हान असल्याचे अझीम पेमजी युनिर्व्हसिटीच्या अहवालात म्हणण्यात आले.

या विद्यापीठाकडून ‘द स्टेट ऑफ वर्किंग इंडिया’ या अहवालात 50 हजार रुपये अथवा त्यापेक्षा अधिक कमाई असणाऱया भारतीय कामगारांचे प्रमाण केवळ 1.6 टक्के असल्याचे म्हणण्यात आले. देशातील कामाच्या गुणवत्तेमध्ये अजूनही सुधारणा दिसून येत नाही. कर्मचाऱयांचे वेतन अजूनही अल्प असून गेल्या तीन दशकामध्ये त्यामध्ये मंद वाढ दिसून आली. देशातील 57 टक्के कर्मचाऱयांचे सरासरी वेतन 10 हजार अथवा त्यापेक्षा कमी असल्याचे म्हणण्यात आले. मात्र सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने किमान वेतन प्रतिमाह 18 हजार रुपये असावे असे म्हटले होते. तर 59 टक्के कर्मचाऱयांचे मासिक उत्पन्न 5 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे अहवालात सांगण्यात आले.

नियमित कर्मचाऱयाचे मासिक सरासरी वेतन 13,562 रुपये असून अनियमित कर्मचाऱयाचे सरासरी वेतन 5,853 रुपये आहे. सरकारी कर्मचाऱयांमध्ये वेतन अधिक असल्याचे दिसून येते, असे म्हणण्यात आले.

हा अहवाल तयार करण्यासाठी 2000 ते 2015 दरम्यानच्या आकडेवारीचा वापर करण्यात आला. कृषी, असंघटित उत्पादन आणि सेवा या क्षेत्रांतील सीएजीआर साधारण 3 टक्के असल्याचे म्हणण्यात आले. मात्र संघटित उत्पादन क्षेत्रातील वाढ ही असंघटित क्षेत्रापेक्षा अल्प प्रमाणात आहे. यामुळे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील वेतनाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. 2010 पासून 2015 पर्यंत संघटित उत्पादन क्षेत्रात सीएजीआर 2 टक्के, असंघटित उत्पादन क्षेत्रात 4 टक्के आणि असंघटित सेवा क्षेत्रात 5 टक्क्यांची वाढ दिसून आली.

रोजगारनिर्मितीमध्ये घट…

2011 ते 2015 दरम्यान सेवा क्षेत्रात रोजगारनिर्मिती आणि वार्षिक वेतनवाढीमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली असून ती असंघटित उत्पादन क्षेत्रापेक्षा जास्त आहे. जीडीपीमध्ये वृद्धी होत असूनही त्याचा परिणाम रोजगारनिर्मितीमध्ये दिसून येत नाही. सध्या जीडीपीमध्ये 10 टक्के वाढ होते, तर रोजगारनिर्मितीमध्ये हे प्रमाण 1 टक्क्यापेक्षा कमी आहे. 1970 ते 1980 दरम्यान जीडीपी वाढ 3 ते 4 टक्क्यांदरम्यान होती, तर वार्षिक रोजगार वाढ साधारण 2 टक्के होती. मात्र 2000 च्या आसपास जीडीपी वाढ 7 टक्के, तर रोजगारनिर्मिती केवळ 1 टक्का अथवा त्यापेक्षा कमी होती.