|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय’ गाण्याची धमाल

‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय’ गाण्याची धमाल 

ऑनलाईन टीम / पुणे :

सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी लोकप्रिय झालेल्या ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाजलेल्या गाण्याचं विडंबन ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱया अशोक सराफ, विक्रम गोखले, शिवाजी साटम, सतिश आळेकर आणि विद्याधर जोशी यांच्यासह महेश मांजरेकर यांनी हे गीत गायलं आहे. गायक-संगीतकार अजित परबने या गीताला स्वरसाज चढवला आहे.

‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाण्याचं महानगर पालिकेच्या कारभारावर भाष्य करणारं विडंबनही खूप गाजलं. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी आता या गाण्याचं आणखी एक विडंबन केलं आहे. ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटासाठी श्रीरंग गोडबोले यांनी ‘दीघ्या तुझा पोलिसांवर भरवसा ‘हाय काय’ हे गीत लिहिलं आहे.

‘गौरी पिक्चर्स प्रॉडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अशोक सराफ, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी पार्श्वगायन करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी इतर कलाकारांच्या आवाजात एखादं गाणं ऐकणं ही मात्र प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट ठरणार आहे. हाच या गाण्याचा मुख्य युएसपी आहे.

या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. छायांकन करण रावत यांचे असून संकलन सर्वेश परब यांनी केले आहे.