|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » मुठा कालवाग्रस्तांनी प्रशासनाविरोधात केले ‘रास्ता रोको’

मुठा कालवाग्रस्तांनी प्रशासनाविरोधात केले ‘रास्ता रोको’ 

ऑनलाईन टीम / पुणे :

मुठा कालवा फुटून बाधित झालेल्या अद्याप तातडीने जाहीर करण्यात आलेली मदतही करण्यात न आल्याने संतापून या नागरिकांनी शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. कालवाग्रस्तांनी दूपारी दांडेकर पूलाजवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी मुठा कालवा फुटून दांडेकर पूल भागातील सुमारे 98 घरे वाहून जाऊन घरामधील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. काहींचा तर अंगावरच्या कपडय़ांइतकाच संसार शिल्लक राहिला आहे. या घटनेनंतर अनेकांनी घटनास्थळी भेटी दिल्या. विशेषतः शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुर्दैवाने कालवाग्रस्तांना प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

शेवटी नागरिकाची सहनशीलता संपली आणि आता प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी आंदोलनाचे पाऊल उचलले. प्रशासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात आबालवृद्ध सहभागी झाले होते. यावेळी कालवाग्रस्तांच्या हातात प्रशासनाचा निषेध करणारे फलक झळकत होते. या रास्ता रोकोमुळे दांडेकर पुलावर वाहनचालकांना काहीकाळ वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले.

Related posts: