|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावात स्वाईनचे चार रूग्ण, एकीचा मृत्यू

तासगावात स्वाईनचे चार रूग्ण, एकीचा मृत्यू 

प्रतिनिधी/ तासगाव

तासगाव शहरासह परिसरात गेल्या आठ दिवसात स्वाईन फ्लूचे चार रूग्ण आढळले आहेत. माळी गल्ली येथील ‘त्या’ विवाहित महिलेचा मृत्यू हा स्वाईन फ्लूमुळे झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. अलिकडच्या काही वर्षातील तासगावात स्वाईन फ्लूचा हा पहिला बळी आहे. शिवाजीनगर, खाडेवाडी येथील एकास स्वाईन फ्लू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तासगावात एका पाठोपाठ एक स्वाईनचे रूग्ण पाहावयास मिळू लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर तालुक्यात यावर्षी आत्तापर्यंत एकूण तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.

    माळी गल्ली येथील फैरोजा तौफिक मुल्ला (वय 48) यांना ताप येऊ लागल्याने त्यांना प्रारंभी नजीकच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना गुरूवार, चार ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या दरम्यान तासगावातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची 95 टक्के शक्यता व्यक्त केली होती. तर अत्यावस्थेतच त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रात्री आठ च्या दरम्यान मृत्यू झाला. तर याच दरम्यान शिवाजीनगर, खाडेवाडी येथील विमल रमेश साळुंखे यांनाही याच खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

   यावेळी मुल्ला व साळुंखे यांच्या घशातील व नाकातील स्वाईब  तपासणीसाठी घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. शुक्रवारी या दोन्ही रूग्णांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. तर या व्यतिरिक्त तासगावातील इतर दोघांनाही   स्वाईन फ्लू झाला आहे.

     रूग्ण बरा होऊ शकतो : डॉ. अनिल माळी

     ज्या रूग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यांच्या कुटुंबीयांपैकी शंका वाटणाऱया काहीना प्रतिबंधकात्मक औषधोपचार सुरू केले आहेत. असे सांगून तासगांव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल माळी म्हणाले, सर्दी, ताप, खोकला व थाप लागणे ही स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. हा संसर्गजन्य आहे. मात्र वेळेत योग्य निदान होऊन औषधोपचार झाल्यास रूग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.