|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अतिक्रमण प्रतिबंधक पथकावर धक्काबुक्की

अतिक्रमण प्रतिबंधक पथकावर धक्काबुक्की 

सोलापूर / प्रतिनिधी

अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांच्या फौजफाटय़ासह महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेची कुमक शहरातील नवी पेठेतील शिंदे चौकात आली असता, तेथील कुटुंबियांनी या कारवाईला विरोध करीत पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱयांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी चौघांविरूद्ध धक्काबुक्की आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अधिकाऱयांनी अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. अतिक्रमणाची मोहीम धावने कुटुंबियांच्या दारात आली. दारातील फरशी काढण्यासाठी जेसीबी लावताच धावने कुटुंबियांच्या महिला पालिकेच्या अधिकाऱयांवर धावून आल्या. अन् अतिक्रमणाला विरोध केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवित विरोध मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या विरोधालाही न जुमानता धावने कुटुंबियातील महिलांनी महापालिका अधिकारी अन् पोलीसांना धक्काबुक्की केल्याने त्यांना कारवाई न करता परत जावे लागले.

दरम्यान अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अतुल विष्णुपंत भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ललित मिलींद धावने, कौशल्या मिलींद धावने, ओंकार मिलींद धावने आणि कटकधोंड यांचे विरुद्ध कलम 353, 34 प्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी 11 वाजता शिंदे चौकातील जुने दुचाकी विक्री बाजार येथे महापालिकेचे पथक गेले. त्यावेळी पोलीसही त्यांच्या सोबत होते. तेथील काही अतिक्रमणही काढण्यात आले. त्यानंतर धावने यांच्या घरासमोरील अतिक्रमण केलेली फरशी हटविण्यासाठी मोर्चा वळवला. जेसीबीच्या मदतीने फरशी काढत असताना धावने कुटंबियातील महिलांनी पोलिसांना कारवाई करण्यास रोखले. आज रविवार असताना महापालिकेची पथक कामावर कसे आली, असा सवाल केला. तसेच पुर्व सुचना न देता थेट कारवाई का करीत आहात, अशा प्रश्नांची सरबत्तीच काढली. ते पाहुन आसपासच्या जुने दुचाकी विक्री करणारे व्यापारीही तेथे आले. त्यांनी देखील पोलीसांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण केला. काही वेळातच नागरिकांची गर्दी वाढू लागली. नागरिक व व्यापाऱयांनी कारवाईसाठी आलेल्या पदाधिकारी आणि पोलीसांना धक्काबुक्की केली.

सदर कारवाई ही महापालिकेच्या आदेशावरुनच होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु जनतेच्या आक्रोशासमोर पोलीसांनाही काही करता आले नाही. महीला पोलीसांनी धावने परिवारातील महिलांना समजाविण्यासाठी पुढे सरसावले. परंतु त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती पोलीसांच्याही हाताबाहेर गेल्याचे दिसताच पोलीसांनी आणखीन कुमक मागविली. त्यानंतर पोलिसांचा दंडुका पाहताच व्यापारी व नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र तोपर्यंत अतिक्रमण विभागाचे अधिकारी माघारी गेले होते.

अतिक्रमणाचा विळखा आवळतोय

स्मार्ट सिटीकडे झेप घेणाऱया सोलापूर शहराला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. मिळेल त्या ठिकाणी गाडा लावणे, टपऱया थाटणे आणि कंपाऊंडही थाटले आहे. काही ठिकाणी फुटपाथही दुकानधारकांनी बळकावळ्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रूंद असलेले रस्त्ये अरुंद झाले आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहे. शिंदे चौकातही अशाचप्रकारे अतिक्रमण झाले आहे. यासाठी महानगरपालिकेने कारवाई करुन तेथील अतिक्रमण हटविण्याचे ठरविले असून त्या अनुशंगाने हे पथक नवीपेठेत दाखल झाले होते.