|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खंडित वीजपुरवठय़ाने नागरिक त्रस्त

खंडित वीजपुरवठय़ाने नागरिक त्रस्त 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहराच्या विविध भागात हेस्कॉमने रविवारी वीजपुरवठा खंडित केला होता. याचा फटका नागरिकांना बसला. सुटीच्या दिवशीच वीजपुरवठा नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. बऱयाच भागात दुपारपासूनच वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत वीज न आल्याने सुटीचा विचका झाल्याचा अनुभव आला.

हेस्कॉमने पूर्वसूचना दिली असली तरी रविवारच्या दिवशी वीजपुरवठा खंडित  करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. अनेकांनी तरुण भारतकडे दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. आठवडय़ाच्या सुटीच्या दिवशी घरी बसणेही खंडित वीजपुरवठय़ामुळे अवघड होत असून हेस्कॉमने दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन रविवार वगळून करावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.

वीजपुरवठा खंडित करताना तो ठराविक कालावधीत करण्याची मागणीही होत आहे. शहापूर विभागात रविवारी दुपारी गायब झालेली वीज रात्री उशिरापर्यंत आली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी हेस्कॉमच्या विभागीय आणि मुख्य कार्यालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. दूरध्वनी केला असता कार्यालयात कोणीही नाही, सुटी आहे किंवा वीज केव्हा येणार या प्रश्नावर वीज आल्यावर तुम्हाला कळेलच अशी उत्तरे देण्यात आल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडत होती.

या पुढील काळात वीजपुरवठा खंडित करताना काळजी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. रविवारी सुटी असल्याने अनेक जण घरी असतात. उकाडा वाढू लागल्याने विजेची गरज लागतेच. परीक्षा व इतर कारणांनी अभ्यासात व्यग्र असणाऱया विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. याचा विचार करून हेस्कॉमने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.