|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वायुदलाने दाखविली सामर्थ्याची चुणूक

वायुदलाने दाखविली सामर्थ्याची चुणूक 

पंतप्रधानांसह देशाने केले अभिवादन 

वृत्तसंस्था/ गाजियाबाद 

दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबाद येथील हिंडन वायुतळावर सोमवारी वायूदलाचा 86 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित सोहळय़ाच्या प्रारंभी संचलनादरम्यान आकाशगंगा पथकाच्या पॅराजंपर्सनी वायुतळावर 8000 फूटांच्या उंचीवरून झेप घेतली असता उपस्थितांनी जोरदार टाळय़ा वाजवून त्यांच्या साहसाला दाद दिली. तर वायुसैनिकांनी देशवासीयांना थक्क करणाऱया कौशल्यांचे प्रदर्शन करून स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती घडविली आहे. कित्येक देशांच्या राजदूतांनी सोहळय़ाला हजेरी लावून भारताच्या हवाईशक्तीचा अनुभव घेतला.

एअर शोदरम्यान वायुदलाच्या लढाऊ विमानांमध्ये सामील मिग-29, जग्वार, मिराज आणि सुखोई समवेत अनेक विमानांनी सहभाग घेत स्वतःच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले आहे. यादरम्यान सूर्यकिरण आणि सारंग पथकाने देखील थरारक कसरती सादर केल्या. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सलग तिसऱया वर्षी वायुदल स्थापना दिन संचलनाला हजेरी लावली. वायूदलाने त्यांना ग्रूप कॅप्टन पद प्रदान केले आहे.

हिंडन वायुतळावर झालेल्या संचलनात 44 अधिकारी आणि 250 सैनिकांनी स्वतःच्या कौशल्याचे सादरीकरण केले. वायुदलाच्या 86 व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संरक्षण दलाच्या कामांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 86 व्या स्थापना दिनानिमित्त वायुदलाने राज्यात पूर संकटावेळी केलेल्या मदतकार्यांचा उल्लेख करत आभार मानले आहेत. वायुदल केवळ शत्रूपासून देशाचे संरक्षण करते असे नाही, तर नैसर्गिक आपत्तीवेळी बचाव तसेच मदतकार्यांमध्ये नेहमीच आघाडीवर असते. केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरावेळी वायुदलाने व्यापक मोहीम राबवून हजारो लोकांना वाचविले होते. वायु दलाच्या हेलिकॉप्टर्सनी मदत सामग्री, औषधे, धान्य, पेयजल इत्यादींचा पूरग्रस्त लोकांना पुरवठा केला होता.

तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित

वायुदल दिनानिमित्त संचलन मैदानात लावण्यात आलेल्या पडद्यांवर वायूदलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात आले. गगनशक्ती या युद्धाभ्यासाची क्षणचित्रे उपस्थितांना दाखविण्यात आली. तर वायुदल प्रमुख बी.एस. धनोआ यांना वायूदलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टर्सनी सलामी दिली. वायुदल, सैन्य आणि नौदलाचे प्रमुख या सोहळय़ात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले. तर वायुदलाच्या पश्चिम विभागाच्या एअर मार्शलने संचलनाची पाहणी केली.