|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » महाराष्ट्राची बडोद्यावर 5 गडी राखून मात

महाराष्ट्राची बडोद्यावर 5 गडी राखून मात 

विजय हजारे चषक : रोहित मोटवानी, नौशाद शेखची अर्धशतके, गुणतालिकेत दुसऱया स्थानावर

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथे सुरु असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना सहाव्या विजयाची नोंद केली. सोमवारी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने बडोद्यावर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रारंभी, बडोद्याने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 206 धावा केल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना महाराष्ट्राने विजयी आव्हान 44.3 षटकांत 5 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. विशेशा म्हणजे, महाराष्ट्राचा हा 8 सामन्यातील सहावा विजय असून गुणतालिकेत 24 गुणासह दुसऱया स्थानी आहेत.

प्रथम फलंदाजी करणाऱया बडोद्याची 2 बाद 17 अशी खराब सुरुवात झाली. यानंतर, कृणाल पंडय़ा व कर्णधार दीपक हुडा यांनी तिसऱया गडय़ासाठी 80 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पंडय़ाने 52 तर दीपक हुडाने 44 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केल्याने बडोद्याला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. युसुफ पठाणने मात्र 66 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 64 धावांची खेळी साकारल्यामुळे बडोद्याला 50 षटकांत 8 बाद 206 धावापर्यंत मजल मारता आली. महाराष्ट्रातर्फे फल्लाह व स्वप्नील बच्छाव यांनी प्रत्येकी 3 तर अनुपम संकलेचाने 2 गडी बाद केले.

प्रत्युतरातदाखल खेळताना बडोद्याने विजयासाठी दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राचे सलामीवीर स्वप्नील गुगळे (3) व ऋतुराज गायकवाड (9) हे झटपट बाद झाले. स्टार फलंदाज अंकित बावणेलाही  (25) मोठी खेळी साकारता आली नाही. यानंतर, रोहित मोटवानी (7 चौकारासह 59) व नौशाद शेख (10 चौकार व 1 षटकारासह नाबाद 76) यांनी शानदार अर्धशतके खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार राहुल त्रिपाठी 13 धावांवर नाबाद राहिला. बडोद्याकडून अतित शेठने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : बडोदा 50 षटकांत 8 बाद 206 (कृणाल पांडय़ा 52, दीपक हुडा 44, युसुफ पठाण नाबाद 64, फल्लाह 3/21, बच्छाव 3/39)

महाराष्ट्र 44.3 षटकांत 5 बाद 207 (रोहित मोटवानी 59, नौशाद शेख नाबाद 76, अंकित बावणे 25, अतित 3/36).

 

पंजाबचा कर्नाटकवर 6 गडी राखून विजय

बेंगळूर : स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पंजाबने कर्नाटकावर 6 गडी राखून विजय मिळवला. प्रारंभी, आर. समर्थ (54), बीआर शरथ (70) व कर्णधार मनीष पांडे (67) यांच्या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकने 50 षटकांत 296 धावा केल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना पंजाबने विजयी आव्हान अनमोलप्रीत सिंग (106 चेंडूत 138) व शुभमान गिल (77) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर 48.5 षटकांत 4 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह पंजाबला 4 गुण मिळाले आहेत.