|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चौदा हजार शिक्षकांना ड्रेसकोड अमान्य

चौदा हजार शिक्षकांना ड्रेसकोड अमान्य 

गुरुजी दिसणार आता ब्लेझरमध्ये जिल्हा परिषदेच्या बैठकीत चर्चेअंती झाली तडजोड

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना ड्रेसकोड घालण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच सर्वसाधारण सभेचा ठराव होऊनही अंमलबजावणी संदर्भात शिक्षकांचा विरोध असल्याने तडजोड घडविण्यात आली असून, या शिक्षकांनी ड्रेसकोडऐवजी आता काळ्या रंगाचे ब्लेझर घालण्याचे ठरविले असून आता गुरुजी ब्लेझरमध्ये दिसणार आहेत. ड्रेसकोडचा निर्णय घेतल्यानंतर जिह्यातील 14 हजार शिक्षकांनी याला विरोध केला होता. परंतु जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत ब्लेझरवर एकमत झाले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी करण्यात आलेल्या ड्रेसकोडला प्राथमिक संघटनांनी कडाडून विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत ड्रेसकोड घालणार नाही असा पवित्रा घेतला तर या संदर्भात प्रशासनही माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे तब्बल दोन ते तीन तास चर्चा झाल्यानंतर आठवडय़ातील काही दिवस ड्रेसकोड घालण्यास संघटनांनी तयारी दर्शविली असून यामध्ये काळ्या रंगाचा ब्लेझर घालण्याचे मान्य केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने जिह्यातील प्राथमिक शिक्षकांनी ड्रेसकोड घालावा यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला होता. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद भारुड यांनी कोणत्याही परिस्थितीत सभागृहाने घेतलेला निर्णय मान्यच करावा लागेल, जे शिक्षक मान्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला हाता. तर या विषयावर वाद नको म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी शिक्षक संघटनांशी चर्चा करुन निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार अध्यक्ष शिंदे, सभापती शिवानंद पाटील, शिक्षणाधिकारी संजय राठोड आणि विविध 16 शिक्षक संघटनांची बैठक जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सोमवारी पार पडली. यावेळी शिक्षक संघटनेचे प्रतिनिधीत्व शिवानंद भरले यांनी केले तर त्यांनी संपूर्ण जिह्यात एकच प्रकारचा ड्रेसकोड घालणार नसल्याचे स्पष्ट केले तर जिह्यातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या त्या पातळीवर निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. यामध्ये सुसूत्रता येणार नाही आणि त्यामध्ये शिस्तही दिसून येणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकच प्रकारचा ड्रेसकोड घालावा अशा सूचना शिक्षण सभापती शिवानंद पाटील यांनी मांडल्या. यावरही शिक्षक संघटनांनी नकारघंटाच दाखविली. बऱयाच चर्चेनंतर संघटनांनी अखेर काळ्या रंगाचे ब्लेझर घालण्याचे मान्य केले. त्यामुळे शाळेत शिक्षकांनी कोट घालून शाळेत यावे यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर येत्या आठ दिवसात शिक्षकांनी या निर्णयाची अमंलबजावणी करावी अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निर्णयात शिक्षकांनी आपला हातचा राखून ठेवला असून पदाधिकारी आणि अधिकाऱयांनी मोठय़ा हिम्मतीने घेतलेल्या या निर्णयाची हवाच काढून घेतली आहे. तर शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱयांनी यामध्ये ड्रेसकोट पध्दतशीरपणे टाळत केवळ ब्लेझर घालण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांचा उद्देश यामध्ये सफल झाला आहे.

शिक्षक संघटनांनी ड्रेसकोड पध्दतशीरपणे टाळला…

जिल्हा परिषद पदाधिकाऱयांनी ड्रेसकोड संदर्भात घेतलेला निर्णय पध्दतशीरपणे टाळला असून केवळ शाळेच्या कामकाजात शाळेच्या आवारातच ब्लेझर घालण्याचे मान्य करुन पदाधिकाऱयांनी शिस्तीचे धडे देण्याच्या निर्णयाची हवाच काढून घेतली आहे. त्यामुळे वकिलाप्रमाणे केवळ न्यायालयातच कोट घालायचा आणि इतरवेळी मोकाट फिरायचे तसा प्रकार आता शिक्षकांनी सुरु केला आहे. यामध्ये केवळ शाळेच्या आवारातच काळा ब्लेझर घालायचा आणि इतर वेळी मोकाट फिरायचे असा घोळ घातला आहे.