|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

नवरात्र कुलधर्म कुलाचार

बुध. दि. 10 ते 16 ऑक्टोबर 2018

आजपासून नवरात्र सुरुवात होत आहे.कुलदेवतेचे देवत्व अधिक प्रभावी व्हावे त्याचे आपल्या कुटुंबियावर कायम कृपाछत्र रहावे व सर्व प्रकारच्या अनिष्ट शक्तीपासून रक्षण व्हावे, वंशवृद्धी व्हावी. यासाठी नवरात्रीचे व्रत करतात. प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत. पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत, सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत, असे नवरात्राचे प्रकार आहेत. देवतास्थापन, मालाबंधन, अखंड नंदादीप, कुमारीका पूजन ही या व्रताची चार प्रमुख अंगे आहेत. नंदादीपासाठी धातुची जाड समयी वापरावी. तेलाची जोडवात एक वीत लांब करून ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत ठेवावा. तेल संपल्यावर अथवा वाऱयाच्या झुळकीने दिवा शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाममंत्राचा 108 अथवा 1008 वेळा जप करावा. किंवा विष्णूसहस्त्रनाम वाचावे. कुमारीका पूजन म्हणजे नवरात्रीचा प्राण आहे. नवरात्र संपेपर्यंत  किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारीकेचे पाय धुवून तिला मि÷ान्न द्यावे. 2 ते 10 वर्षापर्यंत वय असेल अशा कुमारिकांचे पूजन करावे. स्कंदपुराणात वयानुसार कुमारीकेचे प्रकार सांगितलेले आहेत. दोन वर्षाची कुमारी, तीन वर्षाची त्रिमूर्तीनी, 4 चार वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली, सात वर्षाची चंडीका, आठ वर्षाची शांभवा,  9 वर्षाची दुर्गा, 10 वर्षाची सुभद्रा असे या कुमारिकांचे प्रकार आहेत. त्यांच्या पूजनाने फळ पुढीलप्रमाणे आहे.कुमारी पूजनाने ऐश्वर्यप्राप्ती, त्रिमूर्तीनी, पुजनामुळे भोग व मोक्ष प्राप्ती, कल्याणी पूजनाने धर्म व अर्थप्राप्ती रोहिणी, पूजनाने राज्यपदप्राप्ती, काली पूजनाने विद्याप्राप्ती, राज्य अथवा  सत्ताप्राप्ती होते. दुर्गासप्तशतीतील एकेक अक्षर म्हणजे अग्निसमान आहे. ग्रहबाधा, घोर संकटे, सरकारी संकटे, आकाश पाताळ पृथ्वीवर उद्भवणारे नैसर्गिक उत्पात, वाईट स्वप्ने, दुर्भिक्ष्य, दुष्काळ यासह कोणतेही संकट आले तर त्यातून वाचवीन असे देवीने सप्तशतीच्या बाराव्या पाठातच स्पष्ट केलेले आहे. नवरात्रातील अष्टमीला भद्रकालीची उत्पत्ती झालेली असल्याने या तिथीला महाअष्टमी म्हणतात. नवरात्रात दुर्गास्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, श्री सुक्त यापैकी कोणतेही स्तोत्र पठण करावे. तसेच नवरात्रात सात्त्विक अन्नाचे सेवन करावे. परान्न चुकूनही घेऊ नये,  केल्यास देवदेवता प्रसन्न होऊन समृद्धीचा आशीर्वाद प्रदान करतात. नवरात्रात देवापुढे अखंड दिवा ठेवण्याची प्रथा आहे. काहीवेळा दिव्याला काजळी धरून दिवा विझण्याची शक्मयता असते. त्याला कोणताही दोष नसतो पण नवरात्रात दिवा विझणे हे काहीजणांना अपशकुनासारखे वाटते. पण आपल्या हातून जर पेटता दिवा पडून विझला तरच त्याचा दोष लागतो. त्यासाठी नंदादीप अखंड रहावा यासाठी दोन दिवे देवासमोर लावावेत म्हणजे चुकून एखादा दिवा विझला तरी दुसरा तेवत राहील. नवरात्रात दिव्याला अतिशय महत्त्व आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे लोखंड व शिसे सोडून कोणत्याही धातूचे दिवे लावता येतात. ऐरावताप्रमाणे श्रीमंती यावी यासाठी सोन्याचे दिवे लावून देवपूजन करावे, असे शास्त्रात लिहिलेले आहे. पण ते कुणालाही शक्मय नाही. त्यासाठी चांदी व पितळेचे दिवे लावले जातात. पण सर्व तऱहेने कल्याण व्हावे, दैवी कृपा लाभावी. यासाठी तांब्याचे दिवे लावावेत. तांबे हे देवांना अतिशय प्रिय, त्यामुळे देवपूजेसाठी तांब्याच्या वस्तुंना प्रथम प्राधान्य दिले जाते.

मेष

गुरु अष्टमात येत आहे. वर्षभर सांपत्तिक स्थिती अतिशय चांगली राहील. सतत कुठून तरी पैसा मिळत राहील. संततीच्या बाबतीत जरा त्रास होण्याची शक्मयता आहे. दीर्घकाल टिकणारा एखादा आजार होण्याची शक्मयता. अनेक कामे एकाचवेळी करण्याचा प्रयत्न कराल, पण ती पूणं होतीलच असे नाही. पण जगाचे व्यवहार असतील तर ते पूर्ण करून घ्या. शुक्र उच्च त्यामुळे अर्थप्राप्ती चांगली.


वृषभ

गुरु सप्तमात येत आहे. विवाह झाला असेल नंतर भाग्योदयास सुरुवात होईल. भाऊबंदकी मिटवण्याचा प्रयत्न सफल ठरेल. पाठदुखीचे विकार सतावतील. भागीदारी व्यवसाय असेल तर फायदा होईल. धनप्राप्तीचे नवनवे मार्ग दिसतील. कायमस्वरुपी मोठे काम पूर्ण कराल. प्रगतीच्या नवनव्या संधी येतील. वैवाहिक जीवनात संशयाला वाव देऊ नका.


मिथुन

गुरु ष÷स्थानी येत आहे. आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील. काळजी घ्यावी. निद्रानाशचे विकार उद्भवतील. शत्रुपीडा मात्र कमी होत जाईल. लाभाधिपती रवि दूषित त्यामुळे कमाई व खर्च यात ताळमेळ राहणार नाही. मंगळ, शुक्र सहयोग उत्तम. त्यामुळे विवाहाच्या कामात चांगले यश. संशयास्पद व्यक्तीशी गाठ पडेल.


कर्क

पंचमात गुरु येत आहे. अत्यंत शुभयोग. शिक्षणात चांगले यश मिळेल. प्राध्यापक, शिक्षक, मेडिकल व वकिलांशी संबंध असेल तर संपूर्ण वर्षभर अतिशय भाग्यशाली ठरेल. अचानक धनलाभाच्या बाबतीत चांगले योग. दूषित रविमुळे अनेक कामात, अडथळे, घरगुती सौख्यात बाधा. काहीतरी दुरुस्ती करायला जावून नको ते प्रसंग. शत्रुत्वात वाढ. दिलेले शब्द वेळेवर पाळता येतीलच असे नाही. मंगळामुळे अचानक धनलाभ.


सिंह

चतुर्थात गुरु येत आहे. वर्षभर कौटुंबिक सौख्य चांगले राहील. स्वत:चे घरदार वगैरेची इच्छा पूर्ण होईल. मुलेबाळे व नातवंडांचे सौख्य उत्तम राहील. राशिस्वामी मुडमध्ये नाही. त्यामुळे प्रत्येक कामात विलंब जाणवेल. अंगच्या कलागुणांना वाव देणारा महिना. त्यात पारंगत असाल तर नावलौकीक होण्याचे योग. मंगळामुळे घरगुती वातावरण तप्त राहील.


कन्या

गुरु तृतियात येत आहे. शिक्षणात चांगले यश. आर्थिक स्थिती उत्तम राहील. वर्षभर सतत दूरवरचे प्रवास घडतील. लिखाणात अनेक बाबतीत मोठे यश देणारे ग्रहमान. मोठे धनलाभ, नोकरीतील जुनी थकबाकी वसूल होईल, पण कुटुंबातील वातावरण जरा कटकटी निर्माण करील. एखाद्या कार्यासाठी ठेवलेला पैसा दुसऱयाच कामासाठी खर्च होईल.


तूळ

धनस्थानी गुरु येत आहे. आर्थिक बाबतीत अतिशय चांगला योग. 13 महिन्यांपर्यंत सतत पैसा मिळत राहील. नोकरी व्यवसायात प्रगती. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात मंगलकार्ये घडतील. कशात काही नसताना मोठेपणा मिळण्याची संधी प्राप्त होईल. राशीस्वामी शुक्राचे पाठबळ चांगले. त्यामुळे सर्व कामात यश मिळेल. प्रवासात लाभ, नव्या ओळखी. एखादी व्यक्ती जिवाला जीव देणारी भेटेल.


वृश्चिक

गुरु तुमच्या राशीत येत आहे. मनातील अनेक इच्छा पूर्ण होऊ लागतील. व्यक्तिमत्त्व सुधारेल. मानसिक मरगळ कमी होऊन उत्साहाने कामे करू लागाल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील. पैसा बऱयापैकी मिळेल.पण तुमच्या खर्चिक स्वभावामुळे हाती पैसा टिकेल याची खात्री नाही. त्यासाठी नियोजनपूर्वक कामाची आखणी करा. म्हणजे खर्च आटोक्मयात राहील.


धनु

राशीस्वामी गुरु अनिष्टस्थानी येत असला तरी तो वर्षभर अध्यात्मिक व आर्थिक बाबतीत चांगली फळे देईल. पण स्वभावात एक प्रकारची अस्वस्थता राहील. आर्थिक बाबतीत अतिशय भाग्यवान ठराल. जे काम हाती घ्याल त्यात चांगले यश मिळेल. गुरुचे भ्रमण जरा अनिष्ट आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा.


मकर

लाभस्थानात गुरुच आगमन होत आहे. एक प्रकारचा कुबेर योग होत आहे. वर्षभर सतत पैसा व भेटवस्तू मिळत राहतील. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर चांगले योग आहेत. मंगळ अति उत्तम  त्यामुळे वास्तुविषयक सर्व कामे पटापट होतील. जीवनाला चांगले वळण देणारे ग्रहयोग. मित्र मैत्रिणी भेटतील व त्यांच्यामुळे लाभ होईल.


कुंभ

दशमात होत असलेले गुरुचे आगमन म्हणजेच एक प्रकारचा श्रीमंती देणारा राजयोग. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती हाती येईल. वडिलांच्या पुण्याईचा फायदा मिळेल. भगिनीवर्गाला हा गुरु अतिशय चांगले फळ देणारा आहे. शुक्र व चंद्र यांचा अमृत योग, अनेक कामात चांगले यश देईल. धनलाभ मनासारखे होतील. शारीरिक आरोग्य सुधारेल. जे काम हाती घ्याल ते यशस्वी कराल. घरगुती समस्या मिटतील.


मीन

राशीस्वामी गुरु भाग्यात येत आहे. लोकप्रियता वाढेल. राजकारण व सामाजिक क्षेत्रात असाल तर यशस्वी व्हाल. शिक्षण, आरोग्य, भाग्योदय, संततीसौख्य या बाबतीत अनुकूलता राहील. या वर्षभर या गुरुची अत्यंत शुभ फळे मिळत राहतील. मंगल व दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. गुरुच्या कालखंडात म्हणजेच वर्षाभराच्या काळात जर मुलबाळ झाल्यास एखादा पुण्यात्मा जन्माला येईल व कुटुंबाचे कल्याण करील.