|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मनसेच्या निषेध मोर्चात पालकमंत्री ‘टार्गेट’

मनसेच्या निषेध मोर्चात पालकमंत्री ‘टार्गेट’ 

सावंतवाडीत भव्य मोर्चा : सामूहिक अत्याचारप्रकरणी लॉज मालकास सहआरोपी करण्याची मागणी

प्रतिनिधी / सावंतवाडी:

मळगाव येथील सामूहिक बलात्कार व वेंगुर्ले येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील उपविभागीय पोलीस कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढला. गवळी तिठय़ापासून सुरू झालेल्या या निषेध मोर्चात ‘या पालकमंत्र्याचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, “बलात्काऱयांना फाशी द्या, पालकमंत्र्यांना अटक करा’, अशा गगनभेदी घोषणा देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी शहर दणाणून सोडले. मोर्चात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. मनसेच्या निषेध मोर्चाचे पालकमंत्री दीपक केसरकर हे प्रमुख ‘टार्गेट’ ठरले.

मळगाव येथील अल्पवयीन युवतीवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी रामचंद्र घाडी, राकेश राऊळ, प्रशांत राऊळ या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणी ज्या लॉजचा वापर करण्यात आला, त्या लॉज मालक, व्यवस्थापकाला सहआरोपी करून अटक करावी, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, सर्वजण सत्ताधाऱयांशी निगडीत असल्याने पालकमंत्री केसरकर दबाव आणत आहेत. त्यामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत मनसेने या प्रकरणी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.

येथील गवळीतिठय़ाकडून निषेध मोर्चाला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. मोर्चात मनसे नेते शिरीष सावंत, महिला आघाडी सरचिटणीस रिटा गुप्ता, राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर, मनसे उपाध्यक्षा स्नेहल जाधव, अनिषा आजगावकर, सत्यवान दळवी, संदीप दळवी, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे, मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, राजू कासकर, शैलेश अंधारी, दत्ताराम गावकर, आशा बनकर, बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष सचिन तावडे, दत्ताराम बिडकर, मयूर मुणगेकर, विनोद सांडव, प्रसाद तावडे, गुरुदास गवंडे, कानू दळवी, विजय सावंत, सुधीर राऊळ, अतुल केसरकर, दीपक गावडे, संदीप खानविलकर, संगीता चेंदवणकर यांच्यासह जिल्हय़ातील तसेच मुंबईतील मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोर्चात प्रामुख्याने गृहराज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन युवतीला मनोधैर्य योजनेतून मदत द्या, बलात्काऱयांना फाशी द्या, अशा फलकांसह पालकमंत्र्यांच्या विरोधात फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा कॉलेज रोड, मिलाग्रीस हायस्कूलमार्गे उपविभागीय पोलीस कार्यालयावर नेण्यात आला. उपविभागीय पोलीस कार्यालयाबाहेरही जोरदार घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहानजीक नेत्यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी मुळीक यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे उपस्थित होते.

प्रसंगी न्यायालयात जाऊ!

यावेळी परशुराम उपरकर, शिरीष सावंत आदींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट केले की, ज्या लॉजवर युवतीवर अत्याचार झाला तो लॉज चालकही दोषी आहे. त्याला सहआरोपी करावे. या प्रकरणात पालकमंत्री केसरकर यांचा दबाव असेल, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा देण्यात आला. संबंधित लॉजचालक हा पालकमंत्री केसरकर यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करावा. हा गुन्हा गंभीर असून सखोल तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच वेंगुर्ले येथे एका शिक्षकाने मुलीचे लैंगिक शोषण केले. त्या शिक्षकावरही कारवाई करण्यात यावी. कुठच्याही राजकीय पक्षाचे पुढारी किंवा मंत्री यांच्या दबावाला बळी न पडता दोन्ही गुन्हय़ांचा सखोल तपास करून आरोपींना जन्मठेप होईल, अशी कारवाई करावी. मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील दोघे सख्खे भाऊ असलेल्या आरोपींचे पालक हे पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे हा गुन्हा पुढे दडपण्याचा प्रयत्न करू नये.

पारदर्शक तपास सुरू – शिवाजी मुळीक

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांनी स्पष्ट केले की, या गुन्हय़ाचा कायद्यान्वये पारदर्शक तपास सुरू आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. तसेच लॉज सील करण्यासाठीचा प्रस्तावही जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये कुठचाही राजकीय दबाव आलेला नाही. आपल्या निवेदनातील मागण्यांनुसार सखोल तपास सुरू आहे. निश्चितच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा होईल, असे भक्कम पुरावे पोलीस यंत्रणा गोळा करीत आहे. तसेच अशा गुन्हय़ांसाठी विशेष वकिलांची नेमणूक करण्यात आल्याचेही मुळीक यांनी सांगितले.