|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुंभारमाठचे चव्हाण कुटुंब हादरले

कुंभारमाठचे चव्हाण कुटुंब हादरले 

विजेचा लोळ घरात शिरला : मालवणला मुसळधार पाऊस

वार्ताहर / मालवण:

  मालवण शहरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. कुंभारमाठ चव्हाण भरडेवाडी येथे माजी उपसभापती मधुकर चव्हाण यांच्या घराच्या मागील बाजूने विजेचा लोळ घुसल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. विजेचा लोळ घरात शिरल्याने चव्हाण कुटुंबीय हादरले. या दुर्घटनेत चव्हाण कुटुंबातील बाराजण बालबाल बचावले. सुनिता चव्हाण या चक्कर येऊन कोसळल्या. सायंकाळी समुद्रालाही उधाण आल्याने किनाऱयावर जोरदार लाटा धडकल्या.

साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांचा गडगडाट सुरू झाला. माजी उपसभापती  चव्हाण यांच्या घरामागील स्वच्छतागृहाच्या स्लॅबमधून विजेचा लोळ घरात शिरला.   यावेळी घरात चव्हाण कुटुंबातील बाराजण उपस्थित होते. यावेळी घरातील वीजपुरवठाही खंडित झाल्याने सर्वजण सैरावैरा धावू लागले. केवळ नि केवळ सुदैवानेच सर्वजण सुखरुप घराबाहेर पडले. परंतु सुनिता चव्हाण या घराच्या पाठीमागे राहिल्याने चक्कर येऊन कोसळल्या. चव्हाण कुटुंबियांनी घराच्या पाठीमागे धाव घेत त्यांना घराबाहेर आणले.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान

  विजेचा लोळ घरात घुसल्याने चव्हाण यांच्या स्वच्छतागृहाचे नुकसान झाले. स्वच्छतागृहाचा दरवाजा तुटून पडला. घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर, फॅन या इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णत: निकामी झाल्याने तसेच घरातील वायरिंग पूर्णपणे जळून गेल्याने चव्हाण कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले.

   समुद्रालाही उधाण

   हवामान खात्याकडून आलेल्या संदेशात येत्या 24 ते 48 तासात 50 ते 60 किमीच्या वेगाने वारा वाहणार असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही क्षणी चक्रीवादळ होण्याची स्थिती असल्याने 8 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळपासून समुद्रालाही मोठे उधाण आले आहे. बंदरजेटी, रॉक गार्डन परिसरात जोरदार लाटा धडकत होत्या. मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे मालवण किनारपट्टीवरील बहुतांश मच्छीमारांनी मासेमारीस जाणे टाळले.

Related posts: