|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘सेज’ जमिनीसाठी जादा किंमत देणे हा घोटाळा

‘सेज’ जमिनीसाठी जादा किंमत देणे हा घोटाळा 

सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार,

प्रतिनिधी/ पणजी

‘सेज’साठी प्रमोटर्सना देण्यात आलेली आयडीसीची सुमारे 38 लाख चौ. मी. जमीन परत घेण्यासाठी त्यांना जादा किंमत देणे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना अशा प्रकारची तडजोड करणे म्हणजे घोटाळाशिवाय आणखी काही असूच शकत नाही, असे सांगून गरज पडली तर या प्रकरणी काँग्रेसतर्फे सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना त्याचा निकाल होईपर्यंत थांबण्याची गरज होती. एवढी घाई करण्याची गरज नव्हती. शिवाय आयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा प्रकारे तडजोड करून जमीन परत घेण्याचा ठराव झाला नाही. तसेच त्यावर चर्चाही करण्यात आलेली नसताना सदर तडजोड करणे चुकीचे व बेकायदेशीर असल्याचे चोडणकर यांनी नमूद केले.

तब्बल 123 कोटीचा महाघोटाळा

या तडजोड प्रकरणात रु. 123 कोटीचा महाघोटाळा असल्याचा आरोप करून चोडणकर यांनी सांगितले की हे प्रकरण अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱया इतर विषयात समाविष्ठ करण्यात आले आहे. ज्या संचालक मंडळाच्या बैठकीला एकही महत्त्वाचा सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता आणि त्यात हा विषय घुसवून त्याच्या इतिवृत्तांत बोगसपणे लिहिण्यात आल्यामुळे या प्रकरणात निश्चितच काहीतरी भयानक आहे, अशी शंकाही चोडणकर यांनी प्रकट केली.

तडजोडीसाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे उद्योग खाते असल्यामुळे तेच या तडजोडीसाठी दबाव टाकत आहेत, असे चोडणकर यानी निदर्शनास आणले. खरे म्हणजे त्या सेझ प्रमोटर्सना मोठी रक्कम देण्याऐवजी जमिनीसह त्याच्याकडून रक्कम वसूल करण्याची गरज होती. परंतु भ्रष्टाचारात रुतलेल्या सरकारला त्याची किंमत नाही, असेही त्यांनी नमूद केले.