|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कार झाडावर आदळून दोघे जागीच ठार

कार झाडावर आदळून दोघे जागीच ठार 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने दाभोळेत दुर्घटना

देवदर्शनासाठी जाणाऱया पुण्यातील तरूणांवर काळाचा घाला

प्रतिनिधी /देवरुख

पुण्याहून गणपतीपुळेकडे निघालेली कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले. या अपघात चारजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दाभोळे येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात घडला. यात सागर दगडू गांडले (22, पुणे), युवराज बळीराम जाधव (21, कोथाळा, जालना) हे दोघे जागीच ठार झाले.

पुणे येथून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी सहा मित्र कार घेवून निघाले होते. त्यांची कार दाभोळे गावानजीक आली असता चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्या शेजारच्या झाडावर जावून आदळली. गाडी भरधाव असल्याने गाडीचा अक्षरशः चुराडा झाला हा अपघात सकाळी 7 च्या सुमारास झाला. या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या सागर व युवराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुष्यंत श्रीरंग वालगुडे (25, कोथरूड, पुणे), श्रीराम राजेंद्र पाटील (25, पुणे), अजय अरूण परदेशी व अनिकेत पाटील हे चौघे जबर जखमी झाले असून त्यांना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अजय परदेशी व अनिकेत पाटील याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कोल्हापुर येथे हलवण्यात आले आहे.

हा अपघात इतका गंभीर होता, धडक बसल्यानंतर गाडी चेपली गेल्याने सर्वजण गाडीमध्ये अडकून पडले होते. अपघाताची खबर मिळतातच पं. स. सदस्य जया माने, बापु शिंदे, जयवंत पाटील, अक्षय महाडिक, विश्वास बावकर, अनंत सुर्वे तसेच अन्य स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढले. त्यापैकी युवराज व सागर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले, तर दोघांना साखरप्यात तर दोघांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सकाळी विस्कळीत झाली होती. पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील हे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ते अधिक तपास करीत आहेत. यावेळी पो. हे. कॉ. प्रमोद वाघाटे, कमलाकर तळेकर, पो. कॉ. विशाल कांबळे यांनी अपघातस्थळी मदतकार्य सुरु केल्याने वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली. प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पी. बी. आदाटे यांनी मृतांचे शवविच्छेदन केले असून सायंकाळी उशीरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.