|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » क्रिडा » धोनीला खराब फॉर्मचा फटका बसणार?

धोनीला खराब फॉर्मचा फटका बसणार? 

विंडीजविरुद्ध आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघनिवड आज

वृत्तसंस्था/ हैदराबाद

अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी सध्या खराब फॉर्ममधून जात असल्याने विंडीजविरुद्ध आगामी वनडे मालिकेसाठी निवडकर्त्यांना त्याच्याऐवजी ऋषभ पंतला संधी देणे भाग पडेल का, हे आज (दि. 11) निश्चित होईल. वनडे संघ निवडीसाठी निवड समितीची आज येथे बैठक होत आहे. वनडे मालिकेत 5 सामन्यांचा समावेश असून त्यातील पहिल्या 3 सामन्यांसाठी संघ घोषणा होईल की पूर्ण मालिकेसाठी एकच संघ जाहीर केला जाईल, ते अद्याप स्पष्ट नव्हते. उभय संघात सध्या सुरु असलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर 5 वनडे व 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. उभय संघातील मर्यादित षटकांची ही क्रिकेट मालिका दि. 21 पासून होणार आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या सहभागाबद्दल बरीच चर्चा अपेक्षित आहे. पण, पूर्ण मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली जाणे जवळपास अशक्य कोटीतील मानले जाते. धोनीला पर्यायी फलंदाज कोण, याचा ठोस निर्णय मात्र येथे घ्यावाच लागणार आहे. धोनीच्या यष्टीरक्षणाला आताही पर्याय नसला तरी त्याच्या फलंदाजीचा दर्जा कमालीचा घसरत चालला असल्याने ही मुख्य चिंतेची बाब ठरत आली आहे.

‘धोनी आगामी विश्वचषकापर्यंत खेळू शकतो, हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. पण, ऋषभ पंतची चाचणी करण्यात काहीच गैर नाही. ऋषभ पंत आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीमुळे सहाव्या किंवा सातव्या स्थानी जबरदस्त योगदान देऊ शकतो. सामना आपल्या बाजूने झुकवण्यातही त्याची हुकूमत आहे’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. ऋषभ पंतने ओव्हलवर पदार्पणाचे शतक झळकावल्यानंतर राजकोटमध्ये धुवांधार फलंदाजी करत 92 धावांची आतषबाजी केली. त्या पार्श्वभूमीवर, संघात त्याची वर्णी लागावी, असेच एकंदर सूर आहेत.

दिनेश कार्तिक सध्या संघात आहे. पण, सातत्याचा अभाव आणि दडपणाखाली धावा जमवण्यात येणारे अपयश, त्याच्या मार्गातील मुख्य अडसर ठरु शकेल. मध्यफळीतील फलंदाज केदार जाधव धोंडशिरेच्या दुखापतीने चांगलाच त्रस्त असल्याने मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या टप्प्यात तो निश्चितपणाने खेळू शकणार नाही, असे संकेत आहेत. अम्बाती रायुडूने आशिया चषक स्पर्धेत उत्तम प्रदर्शन साकारले असल्याने येथे विराटने खेळण्याचा निर्णय घेतला तरी रायुडूचे स्थान अबाधित राहू शकते.

सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून हवीहवीशी विश्रांती लाभलेल्या भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांचे या आगामी वनडे मालिकेत पुनरागमन होणे अपेक्षित आहे. रवींद्र जडेजाने दणकेबाज कामगिरीच्या बळावर चांगलीच डरकाळी फोडली असल्याने अक्षर पटेलऐवजी त्यालाच संधी मिळेल, असा होरा आहे. खराब फॉर्ममधील मनीष पांडेवर मात्र उचलबांगडीची कुऱहाड कोसळू शकते. अलीकडील कालावधीत तो बराचसा निष्प्रभ ठरला असल्याने याची

गोलंदाज प्रशिक्षक म्हणतात, केएल राहुल गुणवान तर उमेश यादव कमनशिबी खेळाडू

हैदराबाद : सलामीवीर केएल राहुलकडे बरीच गुणवत्ता असून त्याला आणखी वाव देणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जलद गोलंदाज उमेश यादव मात्र बराच कमनशिबी खेळाडू ठरला असून एकापाठोपाठ एका अपयशामुळे त्याला बाहेरचा रस्ता धरावा लागतो, असे प्रतिपादन भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी केले. वास्तविक, केएल राहुल मागील 16 पैकी 14 डावात अपयशी ठरला आहे. पण, तरीही आगामी ऑस्ट्रेलिया दौरा नजरेसमोर ठेवत, विंडीजविरुद्ध येथील दुसऱया कसोटीत त्याला आणखी एक संधी मिळेल, असेच संकेत आहेत. जसप्रीत बुमराह व इशांत शर्मा पुनरागमन करत असताना उमेश यादवला मात्र पुन्हा एकदा संघाबाहेर व्हावे लागणार आहे.

‘उमेशला दक्षिण आफ्रिका व इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैवच. कारण, त्या दौऱयात जे गोलंदाज खेळले, ते उमेशपेक्षा अधिक बहरात होते. पण, अन्य गोलंदाज ताजेतवाने रहावेत, यासाठी त्यांना रोटेट करायचे असते आणि अशा परिस्थितीत उमेश भविष्यात लवकरच पुन्हा संघात येऊ शकतो’, असे भरत अरुण पुढे म्हणाले.

आघाडीचा फलंदाज केएल राहुल सध्या धावा जमवण्यासाठी झगडत असला तरी त्याची फलंदाजीतील गुणवत्ता अफलातून आहे आणि भविष्यात तो भारतीय संघासाठी भक्कम आधारस्तंभाची भूमिका सक्षमपणे बजावू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बॉक्स

विंडीज कर्णधाराचे टीकेला चोख प्रत्युत्तर…

आमचा संघ लारा असतानाही जिंकू शकला नव्हता!

हैदराबाद : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर विंडीज संघावर बरीच टीका झाली असली तरी विद्यमान कर्णधार जेसॉन होल्डरला त्याची फारशी चिंता नाही. ‘1990 च्या दशकात महान फलंदाज ब्रायन लारासारखे खेळाडू संघात असताना देखील आम्ही भारतात भारताविरुद्ध जिंकू शकलो नव्हतो’, अशा शब्दात त्याने चोख प्रत्युत्तर दिले. वेस्ट इंडीजने 1994 मध्ये भारताविरुद्ध शेवटची मालिका बरोबरीत राखली. लाराने त्यावेळी मोहालीत 91 धावा जमवल्या होत्या. पण, लाराने भारतात खेळलेली ती एकमेव कसोटी मालिका होती.

दरम्यान, राजकोटमध्ये पहिल्या कसोटीतील हाराकिरीविषयी बोलताना होल्डर म्हणाला, ‘भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वलमानांकित आहे आणि आम्ही त्यांच्या देशात खेळत आहोत, हे विसरुन चालणार नाही. 1994 नंतर आम्ही भारतात एकही कसोटी जिंकू शकलेलो नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. या सर्व कालावधीत आमचे अनेक महान खेळाडू संघात होते. पण, तरीही आमच्या पदरी अपयशच आले होते’.

अलीकडेच, माजी विंडीज कर्णधार कार्ल हूपरने विंडीजच्या युवा खेळाडूंवर खरमरीत टीका केली होती. सध्याच्या विंडीज खेळाडूंना केवळ टी-20 करारातच रस असतो, असे त्याने होल्डरचा नामोल्लेख टाळत म्हटले होते. त्याचाही होल्डरने समाचार घेतला.

‘प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा अधिकार आहे. मी फक्त आपण स्वतः काय करावे आणि संघाने काय करावे, यावर लक्ष केंद्रित करुन असतो. त्यामुळे, इतर लोक काय म्हणतात, त्याची माझ्या लेखी फारशी किंमत नाही. अर्थात, मागील पाचपैकी 2 कसोटी मालिका आम्ही जिंकल्या आहेत, ते आता सोयीस्कररित्या विसरले जात आहे’, असे त्याने शेवटी नमूद केले.

Related posts: