|Thursday, December 13, 2018
You are here: Home » क्रिडा » पाकची विजयाकडे वाटचाल

पाकची विजयाकडे वाटचाल 

कांगारूंना 326 धावांची तर पाकला 7 बळींची गरज

वृत्तसंस्था/ दुबई

वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने सात चेंडूत 3 बळी मिळवित पहिल्या कसोटीत पाकिस्तानला  विजयाच्या अगदी समीप आणून ठेवले आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशीअखेर ऑस्टेलियाने 462 धावांचे विजयाचे आव्हान मिळाल्यानंतर 3 बाद 136 धावा जमविल्या होत्या. त्याआधी पाकने दुसरा डाव 6 बाद 181 धावांवर घोषित केला होता. ख्वाजाने या डावातही नाबाद अर्धशतक झळकवले.

मोहम्मद अब्बासने ऍरोन फिंच (49) व मार्श बंधू (शॉन व मिशेल) यांना शून्यावरच बाद केल्याने बिनबाद 87 वरून 3 बाद 87 अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती झाली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सलामीवीर उस्मान ख्वाजा 50 व ट्रव्हिस हेड 34 धावांवर खेळत होते. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी 49 धावांची अभेद्य भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 3 बाद 136 धावा जमविल्या असून त्यांना अद्याप 326 धावांची जरूरी आहे तर गुरुवारी अखेरच्या दिवशी पाकला विजयासाठी आणखी 7 बळींची गरज आहे. या संघांतील दुसरी कसोटी 15 ऑक्टोबरपासून अबु धाबी येथे हाणार आहे.

ऑस्ट्रेलियाने या डावात पहिल्या डावातील खेळाचीच पुनरावृत्ती केल्याचे दिसून आले. पहिल्या डावात ख्वाजा-फिंच यांनी 142 धावांची तर यावेळी 87 धावांची सलामी दिली. पण नंतर 60 धावांतच कांगारूंचे सर्व खेळाडू बाद झाल्याने 202 धावांत पहिला डाव आटोपला होता. या डावात फिंचला चहापानानंतर अब्बासने पायचीत केले. त्याने 99 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार मारले. दोन चेंडूनंतर अब्बासने शॉन मार्शला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले व आपल्या पुढच्या षटकात त्याने मिशेल मार्शला पायचीत केले. ख्वाजाने पहिल्या डावाप्रमाणे या डावातही निर्धारी खेळ करीत अर्धशतक पूर्ण केले असून त्याने 120 चेंडूत 6 चौकार मारले आहेत. हेड 75 चेंडूत 4 चौकारांसह 34 धावा जमवित त्याला चांगली साथ देत आहे. पहिल्या डावात 4 बळी टिपणाऱया अब्बासने 26 धावांत 3 बळी मिळविले आहेत. मात्र लेगस्पिनर यासिर शाहला या डावातही अद्याप एकही बळी मिळविता आलेला नाही.

चौथ्या डावात सर्वाधिक धावा जमवित कसोटी जिंकण्याचा पराक्रम वेस्ट इंडीजने केला आहे. 2003 मध्ये त्यांनी अँटिग्वा कसोटीत ऑस्ट्रेलियाला 7 बाद 418 धावा जमवित नमविले होते. पाकने 3 बाद 45 या धावसंख्येवरून दिवसाची सुरुवात केली होती आणि उपाहारानंतर आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर आसाद शफीक बाद झाल्यावर 6 बाद 181 धावांवर दुसरा डाव घोषित केलला. शफीकने 56 चेंडूत 41 धावा केल्या. याशिवाय इमाम हकने 48, हॅरिस सोहेलने 39, बाबर आझमने नाबाद 28 धावा केल्या. सोहेल व इमाम यांनी चौथ्या गडय़ासाठी 65 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे हॉलंडने 3, लियॉनने 2, लॅबुश्चेनने 1 बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान प.डाव 482, ऑस्ट्रेलिया प.डाव 202, पाकिस्तान दु.डाव-इमाम उल हक 48 (104 चेंडूत 4 चौकार), हाफीझ 17 (38 चेंडूत 3 चौकार), बिलाल असिफ 0, अझहर अली 4, सोहेल 39 (81 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), शफीक 41 (56 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), बाबर आझम नाबाद 28 (53 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हॉलंड 3-83, लियॉन 2-58, लॅबुश्चेन 1-9, एकूण 57.5 षटकांत 6 बाद 181 डाव घोषित.

ऑस्टेलिया दु.डाव- फिंच 49 (99 चेंडूत 5 चौकार), ख्वाजा खेळत आहे 50 (120 चेंडूत 6 चौकार), शॉन मार्श 0 (2 चेंडू), मिशेल मार्श 0 (4 चेंडू), हेड खेळत आहे 34 (75 चेंडूत 4 चौकार), अब्बास 3-26, एकूण 50 षटकांत 3 बाद 136.

Related posts: