|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शानदार मिरवणुकीने नवरात्रोत्सवास प्रारंभ

शानदार मिरवणुकीने नवरात्रोत्सवास प्रारंभ 

पारंपारिक वाद्ये आणि लेझिम पथकाची अदाकारी

प्रतिनिधी/ सोलापूर

घटस्थापनेनिमित्त शहरात विविध मंडळाकडून देवीची आकर्षक सजावट…ढोल, ताशांचा दणदणाट….संबळ, सनई पारंपारिक वाद्याचा सुमधूर आवाज…भक्तांकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेझिम, झांज व ढोल पथकाचे बहारदार प्रदर्शन…फुलांची, गुलालाची उधळण… मिरवणुका पाहण्यासाठी अबालवृध्दासह महिला, तरूणी, तरूणांची गर्दी…आई राजा उदो उदो….सदानंदीचा उदो..उदो, भवानी माता की जयचा जयजयकार अशा जयघोषात शहरातील मंडळाकडून वाजत गाजत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच शहरात ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली.

 नवरात्रोत्सवाला बुधवार पासून सुरूवात झालेली असून पारंपरिक पध्दतीने घटस्थापना करून नवरात्र उत्सवाचा उपवास करण्यास सुरूवात झालेली आहे. बुधवारी शहरातील प्रमुख मंडळाकडून पारंपरिक पध्दतीने मिरवणुका काढून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

   प्रारंभी सोलापूरचे ग्रामदैवत रूपाभवानी मंदिरात सकाळी सात वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते महापूजा करून घटस्थापना करण्यात आली. पहाटे चार वाजता देवीची चरणतीर्थ आरती करण्यात आली. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर रूपाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. यावेळी बंडू पवार, सचिन पवार, राजकुमार पाटील, संजू पवार, स्वप्नील पवार, सागर पंतगे, अण्णा पतंगे, अमोल यादव, संतोष सुरवसे, रवी झपके, राजु मुदगुंड गौरव जक्कापुरे आदी उपस्थित होते.

    दुपारी 3 वाजल्यापासून शहरात मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील विविध शक्तीदेवी मंडळाच्यावतीने लेझिम, झांज, ढोलपथकाच्या गजरात शानदार मिरवणुका काढून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नवीपेठ येथील गंगाविहीर शक्ती पूजा मंडळाची लक्षवेधी मिरवणूक ठरली. नवशक्ती मंडळ, मोदी परिसरातील अष्टपुजा महापंडळाच्या मिरवणुकीत बहारदार खेळ आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. शिवाई नवरात्र मंडळाच्या वतीने आकर्षक लेझिमचा खेळ सादर करण्यात आले त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. शिवस्मारक मंडळाच्या वतीने पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करून शानदार मिरवणूक काढली. जय बजरंग मंडळाच्या वतीने गुलाल व फुलांची उधळण आणि लेझिमचे एकापेक्षा एका डावाच्या सादरीकरणाने भक्तांची मने जिंकली. किरीटेश्वर शक्तीपूजा मंडळ, विजापूर रोडवरील सैफुल नवरात्र मंडळ, जयहिंद नवरात्र मंडळ, स्वराज्य नवरात्र मंडळ अशा मंडळांनी वाजत गाजत व लेझिमचे बहादरप्रदर्शन करीत देवीची मिरवणूक काढली. शहरातील बऱयाच मंडळाकडून सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणुका काढून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

   पोलिस आयुक्तालयाच्या वतीने यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सवाचा पहिला दिवस पार पडला.

         घरोघरी घटस्थापना

 नवरात्रा उत्सवाची धूम सुरू झाली असून सकाळपासूनच घरोघरी तसेच मंदिर व मंडळात मंगलपूर्ण व भक्तीमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. ठिकठिकाणी आराध्यांची गीते व देवींचा जागर करण्यात आला.

तुळजापूरहून ज्योत आणून देवीची प्रतिष्ठापना

जय भवानी, जय शिवाजी, आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदोचा जयघोष करीत सोलापुरासह ग्रामीण भागातील विविध मंडळानी तुळजापूरहून आणलेल्या ज्योतीचे भाविकांनी भक्तीभावात स्वागत केले. देवीच्या उपासकांनी धावत-धावत ज्योत गावी पोहोचविली. ज्योत आणल्यानंतर मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Related posts: