|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना

आई राजा उदो उदोच्या गजरात घटस्थापना 

प्रतिनिधी/ तुळजापूर

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा प्रमुख उत्सव असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली. पारंपरिक प्रथेनुसार देवीच्या सिंह गाभाऱयात घटकलशाची प्रतिष्ठापना करण्यात आला.

तत्पूर्वी गोमुख आणि कल्लोळ तिर्थातील पवित्र जल घटकलशात भरण्यात आले. त्यानंतर मंदिर संस्थान अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटकलश संबळाच्या तालावर, आई राजा उदो उदोच्या गजरात वाजत गाजत मंदिरात आणण्यात आला.

त्यानंतर मंदिरातील सिंह गाभाऱयात ब्रह्मवृदांच्या मंत्रोपचाराच्या उद्घोषात अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) राहुल पाटील, तहसीलदार योगीता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे युवराज साठे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, भोपे पुजारी बाळकृष्ण कदम, अतुल मलबा, अमर परमेश्वर, विकास मलबा, अमित कदम, रुपेश परमेश्वर, सुधीर कदम, विश्वजीत पाटील, अविनाश गंगणे यांच्यासह सेवेकरी, मंदिर कर्मचारी यांची उपस्थिती होती. देवीच्या घटस्थापनेनंतर मंदिर परिसरातील उपदेवतांच्या घटकलशांची विधिवत प्रतिष्ठापना झाली.

यानंतर नवरात्र काळातील यज्ञविधीसाठी ब्रह्मवृंदांना मंदिर संस्थान अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वर्णी देण्यात आली. याप्रसंगी विशाल कोंडो, अनंत कोंडो, सुनीत (बंडू) पाठक, हेमंत कांबळे, अशोक शामराज, धनंजय पाठक, गजानन लसणे आदी ब्रह्मवृंदांना वर्णी देण्यात आली. देवीच्या घटस्थापनेनंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली.

नवमीला होमकुंडावर दुपारी पारंपरिक धार्मिक विधी झाल्यानंतर घटोत्थापन करण्यात येऊन शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.

घटस्थापनेपूर्वी बुधवारी रात्री 1 वा. चरणतीर्थ पूजा पार पडली. 1.30 वा. पूजेची घाट झाल्यानंतर 2 वा. तुळजाभवानी देवीचा निद्राकाल पार पडला. त्यानंतर निद्रिस्त केलेली देवीची मूर्ती चांदीच्या पलंगावरून काढून पूर्ववत सिंहासनावर प्रतिष्ठापीत करण्यात आली. यानंतर 2.30 वा. देवीला अभिषेक करण्यात आला. बुधवारी सकाळी 6 वा. पूजेची घाट झाल्यानंतर नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी देवीच्या पंचामृत अभिषेक आणि सिंहासन पूजा पार पडल्या. नित्य अभिषेक विधी झाल्यानंतर देवीस वस्त्रअलंकार चढवण्यात आले. त्यांनतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला. यावेळी महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी बाळकृष्ण कदम यांच्यासह मंदिर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मानाच्या धान्याची पेरणी-

प्रफुल्लकुमार शेटे, यांच्या मानाच्या धान्याची पेरणी घटात करण्यात आली. त्यानंतर हे धान्य भक्तांना वितरीत करण्यात आले. रांगेत असणाऱया देवी भक्तांना दर्शनासाठी सुमारे चार ते पाच तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.

 

Related posts: