|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सह आरोपी मिकी पाशेको असलेल्या प्रकरणावर 23 रोजी निवाडा शक्य

सह आरोपी मिकी पाशेको असलेल्या प्रकरणावर 23 रोजी निवाडा शक्य 

प्रतिनिधी/ मडगाव

माजोर्डा येथील एका कॅसिनोतील कर्मचाऱयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोलवा येथील मॅथ्यू दिनीझ याच्यावर आरोप निश्चिती संदर्भांतील कनिष्ठ  न्यायालयाच्या आदेशावर अतिरिक्त सत्र न्यायालय 23 ऑक्टोबर रोजी आपला निवाडा देण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको संशयित आरोपी म्हणून आहेत.

कोलवा पोलिसांतर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी युक्तिवाद केला.

मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयात सादर केलेल्या आरेपपत्रानुसार 31 मे 2009 च्या रात्री ही घटना घडली होती. संशयित आरोपी माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको, मॅथ्यू दिनीझ व अन्य 10 जण माजोर्डा येथील  एका कॅसिनोमध्ये घुसले व त्यानी कॅसिनो अधिकारी अशोककुमार राव याच्याशी वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली. तिकीटांची खरेदी न करता त्यानी खेळायला सुरुवात केली व त्यानंतर धमकी दिल्याचे राव यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर व सकृत दर्शनी पुरावे पाहुन न्यायदंडाधिकाऱयांनी दोन्ही संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 448 (बेकायदेशीररित्या घुसखोरी करणे), 384 (जबरदस्ती करणे) व 506 (2) जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता.

संशयित आरोपी मिकी पाशेको यांनी या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले नाही. मात्र, या प्रकरणातील दुसरा संशयित मॅथ्यु दिनीझ यानी या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

अतिरिक्त सत्र न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. कनिष्ठ न्यायालयाचा निवाडा सुसंगत आहे. दोन्ही संशयिताविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा आहे. ही घटना पाहणाऱया अनेकांची जबानी पोलिसानी घेतलेली आहे. तक्रारदाराने दोन्ही संशयिताविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार केलेली आहे. या दोन संशयिताबरोबरच आणखी सुमारे 10 जण या प्रकरणातील संशयित आहेत. या संशयिताविरुद्ध पुरावे सादर करुन खटला सिद्ध करण्याची सरकारपक्षाला संधी मिळाली पाहिजे असा युक्तीवाद सरकारपक्षाने केला.

संशयिताच्यावतीने न्यायालयात युक्तीवाद करताना या प्रकरणात काहीही तथ्य नाही, राजकीय हेतुने संशयितांना या प्रकरणात गोवविण्यात आलेले असल्याचा युक्तिवाद संशयिताच्या वकिलांनी केला.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी न्यायालय 23 ऑक्टोबर रोजी आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.