|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पांगुळ गल्ली रस्त्याचे लवकरच रुंदीकरण

पांगुळ गल्ली रस्त्याचे लवकरच रुंदीकरण 

बेळगाव / प्रतिनिधी

पांगुळ गल्लीच्या रस्त्याचे रुंदीकरण होणार अशी केवळ चर्चाच होत आहे. मात्र याबाबत कोणतीच कारवाई अद्याप झाली नाही. रस्त्याचे रुंदीकरण किती फूट होणार? या मुद्दय़ावरून रुंदीकरणाचे काम मागील कित्येक वर्षांपासून रखडले आहे. मात्र या रुंदीबाबत तोडगा काढून पांगुळ गल्ली रस्त्याचे रुंदीकरण दिवाळीनंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाजारपेठेतील विविध अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. कडोलकर गल्ली, रविवार पेठ, टेंगिनकेरा गल्ली, पाटील गल्ली, कलमठ रोड असे विविध रस्ते मोठे झाले आहेत. मात्र पांगुळ गल्लीच्या रस्ता रुंदीकरणाला मुहूर्त मिळत नाही. यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार, अशी विचारणा सातत्याने केली जात आहे. सध्या बाजारपेठेपैकी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पांगुळ गल्लीकडे पाहिले जाते. या ठिकाणी प्रत्येक इमारतीमध्ये व्यावसायिक गाळे आहेत. विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. यामुळे वाहनांच्या वर्दळीसह नागरिकांची गर्दी नेहमी असते. या ठिकाणी होणाऱया गर्दीमुळे दररोज वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असतात. मालवाहू वाहन आल्यास अन्य वाहनांना प्रवेश मिळणे मुश्कील बनते. मालवाहू वाहनातील साहित्य रिकामी करेपर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. परिणामी नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागते. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वारंवार होत आहे.

अन्य रस्त्यांप्रमाणेच सीडीपीनुसार पांगुळ गल्ली रस्त्याचे रुंदीकरण 40 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रुंदीकरणामध्ये मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार असल्याने रहिवाशांनी रुंदीकरणाला विरोध केला होता. सीडीपीनुसार रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेचा आहे. पण 40 फूट रुंदीकरण करण्यात आल्यास दोन्ही बाजूच्या इमारतींचे प्रत्येकी 10 फूट नुकसान होण्याची शक्मयता आहे. रस्त्याचे रुंदीकरण 25 फूट करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र याबाबत तोडगा निघाला नाही. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बारगळले आहे. पण रस्त्याच्या रुंदीबाबत तोडगा काढून रुंदीकरणाचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून दिवाळीनंतर रुंदीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

इमारत मालकांना विश्वासात घेऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच रस्ता रुंदीकरणापूर्वी भूमिगत विद्युतवाहिन्या, 24 तास पाणी पुरवठय़ाच्या जलवाहिन्या, नव्या डेनेज वाहिन्या आणि गॅस वाहिन्या घालण्यात येणार आहेत. यामुळे बाजारपेठेतील आणखीन एका रस्त्याचा विकास होणार आहे. त्याचप्रमाणे नार्वेकर गल्ली, रिसालदार गल्ली, गोंधळी गल्ली या रस्त्यांचेही रुंदीकरण दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्मयता आहे.

Related posts: