|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मनपाच्या विशेष सभेत ‘पाणी’ पेटले

मनपाच्या विशेष सभेत ‘पाणी’ पेटले 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

  पाण्याचे नियोजन कोलमडल्याने शहरामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा सुरु आहे. याचे तीव्र पडसाद मंगळवारी पाण्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत उमटले. सभेमध्ये अधिकाऱयांवर पाणी फेकण्याचा प्रकार घडला. याप्रकाराने सभागृहात एकच गोंधळ उडाला. आयुक्त अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱयांसह सभागृहाबाहेर पडण्याचा पवित्रा घेतला. यावेळी सदस्यांनी त्यांच्या दिशेने फाईली भिरकावत सभागृहाबाहेर जाण्यास मज्जाव केला. यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. सभागृहाबाहेर जाण्यावरुन आयुक्त व नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

  शहरामध्ये सुरु असलेल्या अपुऱया पाणीपुरवठय़ासंदर्भात महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंदे होत्या. गेल्या काहि महिन्यांपासून अपुऱया पाणीपुरवठय़ावरुन शहारासह उपनगरातील नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना दररोज सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठय़ाबाबत अधिकाऱयांनी वारंवार फोन करुनही उचलत नाहीत. तसेच वेळोवेळी खोटी उत्तरे दिली जातात. यावरुन अधिकाऱयांबाबत मनामध्ये असलेला राग नगरसेवकांनी विशेष सभेमध्ये काढला.

  सभेच्या प्रारंभीच महिला सदस्यांना प्रथम बोलण्यास संधी द्यावी, अशी मागणी सदस्या जयश्री चव्हाण यांनी केली. यावरुन काहीकाळ सदस्यांमध्येच गोंधळ सुरु झाला. मात्र प्रश्न महिलांशी निगडीत असल्याने प्रथम महिला सदस्यांना बोलावयास देण्यावर सर्वांचे एकमत झाले. या वाद शांत होतो ना होतो तोच नगरसेवक कमलाकर भोपळे मोकळी घागर घेवून प्रेक्षक गॅलरीत आले आणि त्यांनी आरडा ओरडा सुरु केला. यावरुन सभागृहात पुन्हा गोंधळ उडाला. सदस्यांनी त्यांना खाली येवून बोलण्याची विनंती केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. यावेळी आक्रमक झालेल्या भोपळे यांनी बॅक टू होम म्हणत सभात्याग केला.

Related posts: