|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वायरी भूतनाथ येथील महिलेचा डेंग्यूने मृत्यू

वायरी भूतनाथ येथील महिलेचा डेंग्यूने मृत्यू 

वार्ताहर / मालवण:

वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथील नीता चंद्रकांत साळुंखे (52) यांचा रविवारी सकाळी डेंग्यूने मृत्यू झाला. या घटनेमुळे वायरी भूतनाथ परिसरात भीतीचे वातावरण आहे. डेंग्यूने रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पथकामार्फत वायरी भूतनाथ येथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वायरी भूतनाथ येथील नीता साळुंखे यांना आठ दिवसांपूर्वी ताप आल्याने उपचारासाठी कुटुंबियांनी त्यांना एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. परंतु तेथे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात नीता साळुंखे यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साळुंखे यांना उपचारासाठी पुन्हा खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी साळुंखे कुटुंबियांना नीता यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या. कुटुंबियांनी साळुंखे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू ठेवले होते. रविवारी सकाळी नीता यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सून, सासू, नातवंडे असा परिवार आहे. वायरी भूतनाथ येथील आंबा व्यावसायिक चंद्रकांत साळुंखे यांच्या त्या पत्नी होत.

वायरी भूतनाथ परिसरात भीतीचे वातावरण

वायरी भूतनाथ परिसरातील आणखी एका रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वायरी भूतनाथ परिसरातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करावी, कशी मागणी करण्यात येत आहे.