|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » बिनविरोध संमेलनाध्यक्षपद म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर प्रक्रिया सदोष, गुंतांगुंतीची; घटनादुरुस्तीची संमेलनाध्यक्ष देशमुख यांची मागणी

बिनविरोध संमेलनाध्यक्षपद म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर प्रक्रिया सदोष, गुंतांगुंतीची; घटनादुरुस्तीची संमेलनाध्यक्ष देशमुख यांची मागणी 

पुणे / प्रतिनिधी :

जेष्ठ लेखकांना सन्मानाने साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी तयार करण्यात आलेली निवड प्रक्रिया ही अत्यंत चुकीची आणि गुंतागुंतीची आहे. हा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असून, यामुळे लेखकाचा सन्मान कदापि राखला जाणार नाही. म्हणूनच ही प्रक्रिया बदलण्यासाठी साहित्य महामंडळाच्या घटनेमध्ये दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोमवारी येथे केली.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडण्यासाठी घेण्यात येणारी निवडणूक रद्द करून साहित्य संस्थांमार्फत संमेलनाध्यक्षांची निवड व्हावी, यासाठी नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. या निर्णयाविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. देशमुख म्हणाले, यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर येथील साहित्य संस्थांबरोबरच महाराष्ट्राबाहेरील सहा संस्थांना अध्यक्षपदासाठी नावे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात 28 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे महामंडळाची बैठक होणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये महामंडळाच्या चार घटक संस्थांनी प्रत्येकी तीन नावे, सहयोगी/ संलग्न संस्थांनी प्रत्येकी एक, विद्यमान संमेलनाध्यक्षांनी व यजमान संस्थेने एक अशी एकूण 20 नावे सुचवायची आहेत. त्याप्रमाणे महामंडळाकडे 20 नावे येणार आहेत. त्यांच्यापैकी एकाची निवड करण्यासाठी या वीस नावांपैकी एका नावावर एकमत करणे किंवा बहुमताने एक नाव निवडणे, अशी प्रक्रिया होणार आहे. सद्यःस्थिती पाहता सर्व 20 सहभागी सदस्यांचे महामंडळाच्या बैठकीत एकमत होणे जवळपास अशक्मय आहे. मुख्य म्हणजे अध्यक्षपदाचा हक्क काही मूठभर लोकांकडे एकवटला गेला आहे. 20 नावांपैकी एका साहित्यिकाचे नाव निवडल्यावर इतर साहित्यिकांचा सन्मान राखला जाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महामंडळाने दरवषी पाच मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची एक समिती स्थापन करून त्यांना एकत्र बसवून त्यांच्यामार्फत एका मान्यवर साहित्यिकांची संमेलनाध्यक्षपदासाठी निवड करावी. तसेच या समितीने निवडलेल्या साहित्यिकांची का निवड केली, याचे एक टीपण सह्या करून द्यावे व त्यात त्यांनी कोणते वाङ्मयीन गुणवत्तेचे निकष लावून निवड केली, याची कारणमीमांसा असावी, असेही देशमुख यांनी या वेळी सुचवले.