|Friday, August 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘सर्वोच्च’ निर्णयाविरोधात लाँग मार्च

‘सर्वोच्च’ निर्णयाविरोधात लाँग मार्च 

शबरीमला मंदिर प्रवेश प्रकरण भाजपकडून रॅलीचे आयोजन : हजारोंचा सहभाग : विजयनांची कोंडी

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शबरीमला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडण्यास दोन दिवस शिल्लक असताना केरळमध्ये राजकीय युद्ध पेटले आहे. राज्य सरकारच्या भूमिकेच्या विरोधात ठिकठिकाणी भगवान अयप्पाचे भक्त निदर्शने करत असून भाजपने देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. सोमवारी केरळ मंत्रालयासमोर उग्र निदर्शने करण्यात आली असून यात सुमारे 30 ते 40 हजार भाजप कार्यकर्ते तसेच अयप्पाभक्त सामील झाले. भाजप नेते मुरलीधर राव आणि तुषार वेल्लापल्ली यांनी या निदर्शनांचे नेतृत्व केले. शबरीमला मंदिर विषयक न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात देशात अन्य ठिकाणी देखील निदर्शने सुरू आहेत.

भाजप प्रदेश अध्यक्ष पी.एस. श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली मागील 5 दिवसांपासून चाललेल्या रॅलीचा सोमवारी समारोप झाला. केरळच्या अनेक भागांमधून भाजपची ही रॅली रविवारी तिरुअनंतपुरममध्ये पोहोचली होती. न्राज्यातील एलडीएफ सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा उघडला आहे. न्यायालयाचा निर्णय लागू करण्याच्या  विजयन सरकारच्या भूमिकेनंतर हिंदू संघटनांनी निदर्शने चालविली आहे. न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश दिला होता.

दोन दिवसांनी दर्शनास प्रारंभ

शबरीमला मंदिर पूजेसाठी दोन दिवसांनी खुले केले जाईल. न्यायालयाच्या निर्णयामुळे पहिल्यांदाच महिला मंदिरात प्रवेश करू शकणार आहेत. वाद पाहता त्रावणकोर देवस्वोम मंडळाने तंत्री परिवार, पंडलम पॅलेसचे प्रतिनिधी आणि अयप्पा सेवा संगमच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलाविले आहे.