|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » शेअरबाजारांची पुन्हा घसरण, नकारात्मक स्थितीचा परिणाम

शेअरबाजारांची पुन्हा घसरण, नकारात्मक स्थितीचा परिणाम 

रूपयाची कमजोरी, महागाई दरातील वाढीचा विपरीत परिणाम

वृत्तसंस्था / मुंबई

रूपयाची सातत्यपूर्ण कमजोरी आणि सप्टेंबरमध्ये महागाई दरात झालेली काही प्रमाणात वाढ याचा संयुक्त परिणाम झाल्याने शेअरबाजारांना पुन्हा घसरणीचे ग्रहण लागले आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी दिवसअखेर 70.85 अंकांनी घसरून 34,662.73 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी दिवसअखेर 21.85 अंकांच्या घसरणीसह 10,450.65 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअरबाजाराच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही काही प्रमाणात घट दिसून आली. मात्र घसरणीपूर्वी मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकाने 35 हजाराची पातळी ओलांडली होती. तथापि नंतर बाजाराचे आलेख उतरला.

बाजारांच्या घसरणीला आंतरराष्ट्रीय परिस्थितीही प्रामुख्याने कारणीभूत ठरली. आशियायी शेअरबाजारांमधील घसरण, आणि अमेरिका व चीन यांच्यातील न थांबणारे व्यापार युद्ध यांचाही परिणाम भारतीय शेअरबाजारांना भोगावा लागत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी किंवा विक्रीत अतिउत्साह दाखवणे टाळावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

औद्योगिक उत्पादनवाढ दरात घट झाल्याची आकडेवारी सरकारने प्रसिद्ध केली आहे. ऑगस्टमध्ये हा दर 4.3 असून तो त्यापूर्वीच्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी आहे. रूपयामध्येही सोमवारी 36 पैशांची घट झाली आहे.

सोमवारच्या व्यवहारांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागदरांमध्ये 3.28 टक्क्यांची घट झाली. त्याच प्रमाणे आयसीआयसीआय बँक, मारूती सुझुकी, ऍक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा, कोल इंडिया, अदानी पोर्टस्, एशियन पेंटस्, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, वेदांता आणि टाटा स्टील या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पहावयास मिळाले.

तथापि, सन फार्मा, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज या महत्वाच्या कंपन्यांचे समभाग वधारले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी 1 हजार 322 कोटी रूपयांच्या समभागांची विक्री केली.

सध्याच्या काळात निर्देशांकाच्या चढउतारांना कोणतीही दिशा असल्याचे दिसत नाही. कारण आर्थिक वातावरण (देशांतर्गत आणि देशाबाहेरचे) कमालीचे अस्थिर आहे. त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.