|Friday, August 23, 2019
You are here: Home » क्रिडा » डेन्मार्क ओपनमध्ये सायना, सिंधूवर भारताची मदार

डेन्मार्क ओपनमध्ये सायना, सिंधूवर भारताची मदार 

वृत्तसंस्था/ कोपनहेगन

ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू व सायना नेहवाल यांच्यावर आजपासून सुरु होणाऱया डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असणार आहे. या स्पर्धेत सिंधूला तिसरे तर सायनाला बिगरमानांकन देण्यात आले आहे. पुरुषांत किदाम्बी श्रीकांतकडून अपेक्षा असतील, युवा खेळाडू एचएस प्रणॉयने स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाल्यानंतर माघार घेतली आहे.

सोमवारी डेन्मार्क ओपनचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. सिंधूला तिसरे मानांकन असून सलामीच्या लढतीत तिच्यासमोर अमेरिकेच्या बेविन झांगचे आव्हान असणार आहे तर उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची लढत अग्रमानांकित स्पेनच्या कॅरोलिन मारीनशी होईल. अलीकडील काळात खराब फॉर्ममध्ये असणाऱया सायनाला बिगरमानांकन देण्यात आले आहे. सलामीच्या लढतीत सायनासमोर हाँगकाँगच्या चेयूंग नॅगेनचे आव्हान असणार असून उपांत्यपूर्व लढतीत सायनाला वर्ल्ड 2. अकाने यामागुचीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पुरुषांत के.श्रीकांतवरच मदार

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतला सातवे मानांकन देण्यात आले आहे. त्याला पहिल्याच लढतीत डेन्मार्कच्या ख्रिस्टिनचा सामना करावा लागेल. तसेच युवा खेळाडू बीसाई प्रणितसमोर चीनच्या हुआंग युक्सिनचे आव्हान असणार आहे. याशिवाय, समीर वर्माला कठीण ड्रॉ मिळाला असून त्याच्यासमोर चीनच्या सहाव्या मानांकित शेई युकीचे आव्हान असेल. स्टार खेळाडू एचएस प्रणॉयने मात्र ड्रॉ जाहीर झाल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे. प्रणॉयसमोर सलामीच्या लढतीत कोरियन सुन वान होचे आव्हान होते. राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपचा पासपोर्ट हरवल्यामुळे त्याला या स्पर्धेत सहभागी होता आले नाही.

पुरुष दुहेरीत मनु अत्री-बी सुमित रेड्डी यांना स्थानिक खेळाडू किम ऍस्ट्रप व ऍडर्स यांचा सामना करावा लागेल. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सात्विकराज या जोडीसमोर सलामीच्या लढतीत कोरियाच्या सेयुंग व चाय युजुंग या जोडीचे आव्हान आहे.