|Friday, May 24, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताच्या दोन्ही संघांना रौप्यपदके

भारताच्या दोन्ही संघांना रौप्यपदके 

युवा ऑलिम्पिक हॉकी : पुरुषांत मलेशियाला तर महिलांत अर्जेन्टिनाला सुवर्ण, चारही संघांची पहिलीच पदके

वृत्तसंस्था/ ब्युनॉस आयर्स

भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांनी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. दोन्ही संघांना अंतिम फेरीत अनुक्रमे मलेशिया व यजमान अर्जेन्टिनाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र तरीही दोन्ही संघांनी या स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

युवा ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या भारतीय हॉकी संघाला इतिहास रचण्याची नामी संधी होती. पण अंतिम लढतीत अपेक्षित खेळ न झाल्याने भारतीय संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या फाईव्ह ए साईड हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला मलेशियाने 4-2 अशा गोलफरकाने हरविले तर महिला संघाला अर्जेन्टिनाने 3-1 असे नमवित सुवर्णपदक पटकावले. युवा ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघांनी मिळविलेली ही पहिलीच रौप्यपदके आहेत. त्याचप्रमाणे मलेशियन पुरुषांनी व अर्जेन्टाईन महिलांनीही पहिल्यांदाच सुवर्ण जिंकत नवा इतिहास घडविला. पुरुषांमध्ये अर्जेन्टिनाने झाम्बियाचा 4-0 तर महिलांमध्ये चीनने दक्षिण आफ्रिकेचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून कांस्यपदक मिळविले.

सुवर्णपदकासाठी झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने दुसऱयाच मिनिटाला आघाडी मलेशियावर आघाडी घेतली. विवेक सागर प्रसादने हा गोल नोंदवला. पण ही आघाडी त्यांना फार वेळ टिकविता आली नाही. दोनच मिनिटानंतर फिरदुस रोसदीने गोल नोंदवून मलेशियाला बरोबरी साधून दिली. पाचव्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल नोंदवून भारताला पुन्हा 2-1 असे आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत भारताने ही आघाडी टिकविली होती.

उत्तरार्धात मलेशियाने जोरदार प्रदर्शन करीत भारतावर बरेच दडपण आणले. या सत्रातील 13 व्या मिनिटाला अखिमुल्लाह अन्वरने गोल करून मलेशियाला 2-2 असे बरोबरीत आणले आणि तीनच मिनिटानंतर अमिरुल अझहरने मलेशियाला 3-2 अशी आघाडीही मिळवून दिली. शेवटची दोन मिनिटे बाकी असताना अखिमुल्ला अन्वरने आणखी एक गोल नोंदवून मलेशियाचे सुवर्णपदक निश्चित केले आणि भारताला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाचे हे युवा ऑलिम्पिक हॉकीतील पहिलेच पदक आहे.

अर्जेन्टिना महिलांची बाजी

महिलांच्या अंतिम लढतीत अर्जेन्टिनाला मोठय़ा संख्येने जमलेल्या स्थानिक शौकिनांचा पाठिंबा मिळाला. अर्जेन्टिनाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमविलेला नाही. पण अंतिम लढतीत 49 व्या सेकंदालाच भारताने गोल नोंदवून त्यांना चकित केले. मुमताज खानने हा गोल नोंदवला होता. मात्र यातून सावरल्यानंतर अर्जेन्टिनाच्या महिलांनी चमकदार प्रदर्शन करीत सहाव्या मिनिटाला भारताशी बरोबरी साधली. गायनेला पॅलेटने अर्जेन्टिनाचा हा गोल नेंदवला. पूर्वार्ध संपण्यास 9 मिनिटे असताना सोफिया रमालोने अर्जेन्टिनाचा दुसरा गोल नोंदवून भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ब्रिसा ब्रुगेसरने त्यात आणखी एका गोलाची भर घालून अर्जेन्टिनाला 3-1 अशी बढत मिळवून दिली. भारताने उर्वरित वेळेत अर्जेन्टिनाला गाठण्याची खूप धडपड केली. पण अर्जेन्टिनाच्या बचावपटूंनी त्यांनी संधी न देता पहिले युवा ऑलिंिम्पक हॉकीचे सुवर्ण पटकावले. स्थानिक शौकिनांनीही प्रचंड जल्लोष करून जेतेपद साजरे केले.

भारताला या स्पर्धेत एकूण 10 पदके मिळाली असून पदकतालिकेत भारत 10 व्या स्थानी आहे. यामध्ये 3 सुवर्ण व 7 रौप्यपदकांचा समावेश आहे. रशिया 43 पदकासह अग्रस्थानी आहे.

 

Related posts: