|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला यंदा दमडीही नाही

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला यंदा दमडीही नाही 

सोलापूर  / प्रतिनिधी

जिह्याला यंदा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून दमडीच्याही निधीची तरतूद करण्यात आली नसल्यामुळे जिह्यातील रस्ते बांधणीच्या कामाला खो बसला असून जिह्यातील रस्ते चकचकीत होण्याचा मार्ग खडतर बनला आहे.

प्रत्येक गावाला पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला ही शासनाने मोठय़ा थाटामाटात प्रारंभ करण्यात आला होता. जिह्यात गतवर्षी या योजनेतून 25 कोटी रुपयांचे जवळपास 17 रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये एक काम वगळता सर्वच कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात आले आहे. यामुळे गावातील नागरिकांना येण्या जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर अनेक गावांना या योजनेतून पक्के रस्ते मिळाले. त्या गावांच्या विकासाला चालना मिळाली आहे. मात्र यंदा या योजनेला अद्याप उद्दिष्ट मिळालेले नाही, त्यामुळे चालू वर्षी या योजनेतून एक ही रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला नाही.

केंदशासनाने मोठ मोठय़ा जाहिराती करुन या योजनेचा गाजावाजा केला असला तरी यंदा सोलापूर जिह्याला मात्र या योजनेतून काहीही मिळाले नाही. त्यामुळे जिह्याच्या विकासाला यामुळे खिळ बसणार आहे. जिल्हा नियामक मंडळाची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी ग्रामीण जिवन्नोती अभियान, दीनदयाल उपाध्याय कौशल्य येजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

तर जिह्यातील बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी दीनदयाल जागा खरेदी योजनेतून जागा घेण्यासाठी ही लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. त्या योजनेसाठी जिह्यातून 33 लाभार्थ्यांचे अर्ज ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झाले होते. त्यापैकी 18 लाभार्थ्यांना 10 लाख रुयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

 

घरकुल योजनेत जिल्हा राज्यात दुसरा

प्रत्येक बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अशा विविध योजना राबविण्यात आल्या. यामध्ये सोलापूर जिह्याला 10 हजार 466 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी 437 लोकांनी पैसे परत केले आहेत तर 9998 लोकांच्या घरकुलांचे काम प्रगती पथावर आहेत. त्यामुळे घरकुल योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱया क्रमांकावर आहे.