|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रत्येक ग्रा.पं.मधून मराठी कागदपत्रे द्यावीत

प्रत्येक ग्रा.पं.मधून मराठी कागदपत्रे द्यावीत 

प्रतिनिधी/ बेळगाव

तालुका पंचायत तसेच अनेक ग्रामपंचायतींमधून आजही मराठी भाषिकांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे आता प्रत्येक ग्रामपंचायतमधून मराठीतून कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी पुन्हा एकदा तालुका पंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या बैठकीत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व म. ए. समिती सदस्यांनी आपली मागणी  लावून धरली. त्यामुळे अध्यक्षांनी पुढील बैठकीत याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

तालुका पंचायतीच्या महात्मा गांधी भवन सभागृहात ही बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. सदस्य सुनील अष्टेकर, रावजी पाटील, काशिनाथ धर्मोजी, नारायण नलवडे, नारायण कदम, आप्पासाहेब किर्तने, नीना काकतकर, मनीषा पालेकर, लक्ष्मी मेत्री यांनी मराठी कागदपत्रांसाठी एकच गोंधळ घातला. प्रत्येक ग्राम पंचायतीला मराठीतून कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष शंकरगौडा पाटील म्हणाले की, तुमच्या मागणीनुसार मराठीतून नोटिसा व इतर कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे कोणत्याही बैठकीत तुम्ही मराठीवरुन वादंग घालू नका. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी भाषिक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 

तालुका पंचायतीच्या बैठकीत मराठी भाषिक सदस्यांनी नेहमीच मराठीतून परिपत्रके द्यावीत, अशी मागणी केली होती तर अनेकवेळा बैठकीतील कामकाजही चालू दिले नव्हते. मात्र मागील बैठकीत मराठीतून कागदपत्रे देण्यात आली आहेत. तालुका पंचायतमधून जशी मराठीतून कागदपत्रे देण्यात आली आहेत तशीच आता प्रत्येक ग्रामपंचायतीमधून मिळावीत, असे आवाहन करण्यात आले. मात्र अध्यक्षांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे सुनील अष्टेकर यांनी त्यांना चांगलेच खडसावत केवळ तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार करू नका, आम्ही आमचा हक्क मागतो आहे, असे सांगितले. यामुळे अध्यक्षांनी पुढील बैठकीत याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले.

Related posts: