|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » मराठी सिनेमाला मल्याळम टच

मराठी सिनेमाला मल्याळम टच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठी चित्रपटाचा ट्रेंड सध्या बदलतोय. मराठी चित्रपटांमधली वाढती प्रयोगशीलता आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे बॉलीवूडसह अनेक प्रादेशिक कलावंतांनाही मराठी चित्रपटसृष्टीने कायमच खुणावलं. पण आता तेवढय़ावरच न थांबता, मल्याळम सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव मराठीत पदार्पण करतंय. विझार्ड प्रोडक्शनच्या माध्यमातून दिग्दर्शक सिजो रॉकी हे प्रीतम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नव्या धटणीची एक सुंदर प्रेमकथा प्रीतमच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सिजो रॉकी आणि विझार्ड प्रोडक्शन मल्याळम इंडस्ट्री मध्ये सर्वश्रुत आहेच, पण त्याचसोबत निर्मिती आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. अनेक लघुपटांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे.

विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत प्रीतम या चित्रपटाचं दिग्दर्शन सिजो रॉकी करीत आहेत. ‘मराठी चित्रपट हा आशयसंपन्न असतो, त्यामध्ये खूप विविधता असते. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय याचा आम्हाला आनंद आहे, असे सिजो रॉकी यांनी सांगितले. चित्रपटाची निर्मिती फैझल निथिन सिजो करत आहेत.

चित्रपटाचे संवाद आणि पटकथा गणेश पंडित यांची असून, चित्रपटाची गीतं गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे कला दिग्दर्शन संदीप रावडे करणार असून संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश तर संगीत विश्वजीथ यांचे आहे. जयकुमार नायर आणि रफिक टी.एम. चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गणेश दिवेकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत आणि सिजो रॉकी दिग्दर्शित प्रीतम या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच कोकणात सुरुवात होणार आहे.