|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » गायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी

गायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी 

ऑनलाईन टीम / पुणे :

 कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास’ सांगितिक कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. यातील छोटे सूरवीर एकाहून एक सरस गाणी गात आहेत. घरातील छोटय़ा स्क्रिनवर दिसणाऱया या कार्यक्रमाच्या पाठीमागे, अर्थात पडद्यामागील अनेक अदृश्य हात आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा हात आहे तो सुप्रसिद्ध गायक प्रसन्नजीत कोसंबीची सौभाग्यवती श्वेता कोसंबी-परांजपेची! या कार्यक्रमाची ‘कोऑर्डिनेटर’ म्हणून श्वेता काम पहात आहे. छोटय़ा सूरवीरांच्या तयारीपासून ते त्यांना स्टेजवर जाईपर्यंतची तयारी श्वेताकडे असते. ही जबाबदारी ती यशस्वीरित्या सांभाळत आहे.

श्वेताने 4 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिच्याशी संपर्क साधला असता तिने या क्षेत्रातील आपला प्रवास ‘तरूण भारत’बरोबर उलगडला. गेली 14 वर्षे श्वेता या क्षेत्रात आहे. 2006 साली या क्षेत्रात नव्याने सुरूवात करणाऱया श्वेताने आतापर्यंत अनेक रिऍलिटी शोसाठी कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले आहे.

6 वर्षे तिने झी-मराठीसाठी अधिक काम केले आहे. झी-मराठीवरील ‘होम मिनिस्टर, हास्यसम्राट सीझन-1 व 2, महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि सारेगामाप’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांसाठी तिने कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले आहे. होममिनिस्टसारख्या आजही लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कार्यक्रमासाठी सुरूवातीच्या काळात श्वेता शुटींगचे शेडय़ुल्ड, त्या-त्या शहरांतील कुटुंबाशी संपर्क ठेवून श्वेता नियोजन करत होती. ‘हास्यसम्राट’च्या ऑडिशनचे नियोजन, शुटींगच्यावेळी स्पर्धकांना शेडय़ुल्डची माहिती देणे, त्यांची रहाण्याची व्यवस्था, शुटींगच्या थीमनुसार मेकअपमन आणि ड्रेस डिझायनरशी संयोजन करणे आदी महत्त्वपूर्ण कामे श्वेता पहात होती. अर्थातच या सर्व लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये श्वेताचा मोलाचा वाटा आहे.

‘सारेगामाप’च्या 10 सीझनला आताचा आघाडीचा गायक प्रसन्नजीत कोसंबी स्पर्धक होता. याचदरम्यान प्रसन्न आणि श्वेताचा सूर जुळला आणि त्याचे रूपांतर लग्नात झाले. 2012 साली शुभमंगल झाल्यानंतर त्यांच्या घरात एक छोटा पाहुणा आला. या सांसारिक जबाबदाऱयांमुळे तिने कोऑर्डिनेटरच्या जबाबदारीतून 5 वर्षांचा अवकाश घेतला होता.

आता कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’मधील छोटे सूरवीरांची जबाबदारी घेऊन तिने पुन्हा आपल्या कामाला सुरूवात केली आहे. कार्यक्रमांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असते, मात्र त्यामागील श्वेतासारखे दिवस-रात्र अवरित झटणारे हात कुणाच्या दृष्टीस पडत नसतात.

5 वर्षांच्या अवकाशानंतर पुन्हा कोऑर्डिनेटरची जबाबदारी सांभाळताना खूप आनंद होत आहे. पुन्हा आत्मविश्वासाने मी माझ्या कामाला सुरूवात केल्याची प्रतिक्रिया श्वेताने ‘तरूण भारत’जवळ व्यक्त केली. अर्थात यासाठी तिच्या पाठीमागे पती प्रसन्नजीत कोसंबी नेटाने उभा राहिला आहे. तर छोटा मुलगा विहान श्वेताला खूप सहकार्य करतो. तसेच ती ‘सूर नवा ध्यास नवा’चे प्रोडय़ुसर आणि डिरेक्टर प्रशांत नाईक, पर्पल पॅच मिडियाची संपूर्ण टीम, प्रोडय़ुसर समीर जोशी आणि कलर्स मराठी वाहिनीचे सर्व सिनिअर्सचे आभार व्यक्त करते.