|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’

पुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ 

पुणे / प्रतिनिधी :

पुण्यात यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये 26, 27, 28 ऑक्टोबर रोजी 14 वा पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव सादर होणार आहे. तर महोत्सवांतर्गत देण्यात येणारा ‘पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार’ यंदा सांगितिक कार्यक्रम निर्माते अरूण काकतकर, तर ‘युवा पुरस्कार’ डॉ. रेवती कामत यांना देण्यात येणार असल्याची माहिती पं. शौनक अभिषेकी यांनी पुण्यात दिली.

महोत्सवाचे आयोजन उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता महोत्सवाचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असून यावेळी महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तीन दिवसांत पाच सत्रात महोत्सव सादर होणार आहे. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सकाळच्या सत्रात युवोत्मेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. सर्व कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातच होणार असून रसिकांसाठी विनामुल्य खुले आहेत.

26 रोजी उद्घाटनानंतर ‘सुगम संगीत रजनी’ होणार आहे. यामध्ये गायिका प्रियांका बर्वे, सावनी रविंद्र, गायक हृषिकेश रानडे, अनिरूद्ध जोशी यांचा सहभाग आहे. तर निवेदन मिलिंद कुलकर्णी यांचे आहे. 27 रोजी सकाळी 9 वाजता युवोन्मेष कार्यक्रमात अद्वैत केसकर, गंधार देशपांडे यांचे गायन, अनिरूद्ध जोशी याचे सतारवादन होणार आहे. सायंकाळी प्रसिद्ध गायिका शाश्वती मंडल यांचे गायन, पार्था बोस यांचे सतार वादन होणार आहे. तर दुसऱया दिवसाचा समारोप पद्मश्री पं. विजय घाटे, श्रीधर पार्थोसारथी, शीतल कोलवलकर, मिलिंद कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांच्या सादरीकरणाचा ‘मेलोडिक रिदम’ हा अनोखा कार्यक्रम होणार आहे.

महोत्सवाच्या समारोपादिवशी रविवारी 28 रोजी सकाळी 9 वाजता युवोन्मेष या कार्यक्रमामध्ये रागिणी देवळे (गायन), सत्येंद्रसिंह सोळंकी (संतूर), युवा पुरस्कार विजेत्या कलाकार डॉ. रेवती कामत (गायन) यांचे सादरीकरण होणार आहे. तर सायंकाळी 5.30 वाजता पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य समीर दुबळे यांचे शास्त्राrय गायन, नृत्यांगना वरदा फडके हिचे कथ्थक नृत्य होणार आहे. तर महोत्सवाचा समारोप आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे. त्यांना आदित्य कल्याणपूरकर यांची तबलासाथ लाभणार आहे. संपूर्ण महोत्सवात दिग्विजय, जोशी, मिलिंद कुलकर्णी, रविंद्र खरे, सौ. रश्मी अभिषेकी निवेदन करणार आहेत.