|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » श्रीरामवाडीत निसर्गाचे रौद्र तांडव

श्रीरामवाडीत निसर्गाचे रौद्र तांडव 

वीज कोसळून माड पेटला : ग्रामस्थ थोडक्यात बचावले : समुद्रातही तुफान भरकटलेल्या नौकेला ट्रॉलरने वाचविले

प्रतिनिधी / म्हापण:

 मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याचा सुमार.. स्थळ : कोचरा-श्रीरामवाडी.. थरकाप उडविणारा विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट, जोरदार वारा आणि जोडीला पाऊस असे निसर्गाचे तांडव तेथे सुरू होते..समुद्रातही तुफान सदृश परिस्थिती दिसत असल्याने नौका पाहण्यासाठी काही ग्रामस्थ श्रीरामवाडी-जेटी येथील शेडमध्ये उभे होते..एवढय़ात कानठळय़ा बसविणारा प्रचंड आवाज झाला…विजेचा लोळ तेथील माड बागायतीतील माडाच्या झाडावर झेपावला आणि झाडाने बघता-बघता पेट घेतला..त्याचवेळी तेथील जेटीच्या नजीकही वीज कोसळली आणि सारेच अक्षरश: थरथरले..काळ अगदी जवळ येऊन गेला होता..

 घडला प्रसंग तो असा, कोचरा-श्रीरामवाडी येथे काल सायंकाळी लखलखणाऱया विजा, ढगांचा गडगडाट, जोरदार वारा आणि पाऊस असे रौद्ररुप निसर्गाने धारण केले होते. निवती बंदरातून दहा ते पंधरा फायबर बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. तेथीलच गणेश कोचरेकर, लक्ष्मण सारंग, विठोबा कोचरेकर, हिरोचन सारंग, विनायक मेतर, राजन खवणेकर, विनायक खवणेकर आदी ग्रामस्थ समुद्रात तुफानसदृश परिस्थिती दिसत असल्याने नौका पाहण्यासाठी श्रीरामवाडी जेटी येथील शेडमध्ये उभे होते. त्याचवेळी आसमंत कानठळय़ा बसविणाऱया आवाजाने दणाणला. तेथील भगवान श्रीहरी निवतकर यांच्या माड बागायतीतील माडावर वीज पडून माडाने पेट घेतला. तोच लोळ ग्रामस्थ उभे असलेल्या शेडपासून पन्नास मीटर अंतरावर जमिनीवर पडला. क्षणभर ग्रामस्थांना काय घडले तेच समजले नाही. ‘केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो’.. त्या धक्क्यातून सावरल्यानंतर त्या ग्रामस्थांची ही प्रतिक्रिया होती. पाऊस जोरदार असल्याने पेटलेला माड विझला. अन्यथा अनर्थ घडला असता.

 रात्री नऊच्या दरम्यान समुद्रात गेलेल्या बोटी किनाऱयावर परत येऊ लागल्या. त्यातील खलाशांनीही तुफानी वाऱयाचा समुद्रातील अनुभव थरारक होता, असे सांगितले. निवती येथील दिनेश नारायण कोचरेकर यांच्या मालकीची फायबर नौका तेथील समुद्रात अंदाजे दहा वाव खोल समुद्रात मासेमारी करीत होती. वादळी वाऱयाचा अंदाज आल्याने त्यांनी जाळी गोळा करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी ही नौका वाऱयाच्या जोरदार प्रवाहात अडकली. इंजिन सुरू असतानाही पंधरा ते सोळा वाव खोल समुद्रात ती भरकटू लागली. प्रसंगावधान राखून बोटीवरील खलाशांनी भर समुद्रातच मासेमारीसाठी टाकलेली जाळी सोडून दिली. याचवेळी मालवण येथील ट्रॉलर त्यांना दिसला. त्या ट्रॉलरने या नौकेस आधार देऊन निवती बंदरात सुखरुप आणून सोडले. तेव्हा कोचरेकर यांच्या बोटीवरील खलाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बुधवारी पुन्हा समुद्रात जाऊन जेथे जाळी सोडली होती. तेथे जाऊन ती परत आणली. मात्र, सोसाटय़ाचा वारा व समुद्राच्या पाण्याचा करंट यामुळे जाळय़ांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.

 दरम्यान, जोरदार वाऱयाने कोचरा तसेच आजूबाजूच्या गावातील वीजपुरवठा खंडित झाला. तो उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता.