|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नाणार विरोधी ठराव नियोजन बैठकीच्या इतिवृत्तातून रद्द करा!

नाणार विरोधी ठराव नियोजन बैठकीच्या इतिवृत्तातून रद्द करा! 

नियोजन समिती सदस्य अतुल काळसेकर यांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी

वार्ताहर / कणकवली:

जिल्हा नियोजनच्या बैठकीत मांडण्यात आलेला नाणार ग्रीन रिफायनरी विरोधाचा ठराव हा इतिवृत्तात घेता येणार नसल्याबाबत जिल्हाधिकारी व नियोजनचे सचिव यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. शासनाने 9 ऑक्टोबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत वार्षिक नियोजनाशी संबंधित नाहीत, असे ठराव इतिवृत्तात घेता येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या बैठकीतील नाणार विरोधी ठराव घेण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती भाजप माजी जिल्हाध्यक्ष व नियोजन समितीचे सदस्य अतुल काळसेकर यांनी दिली.

येथील प्रमोद जठार संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काळसेकर बोलत होते. यावेळी प्रभाकर सावंत उपस्थित होते. काळसेकर म्हणाले, नियोजनच्या बैठकीत खासदार विनायक राऊत व शिवसेनेच्या सदस्यांनी निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवत नाणारविरोधी ठराव मांडला. सत्तेत राहून सरकारविरोधी शिवसेनेची भूमिका चुकीची आहे. सत्तेत असल्याने त्यांना हा विषय लोकसभा, विधानसभेत मांडण्याची संधी आहे. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाबाबत परिपत्रकावर सही केली आहे.

दोन वर्षांपूर्वी खासदार विनायक राऊत व केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी एकत्रित नाणार ग्रीन रिफायनरीची घोषणा केली होती. मात्र, आता निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवून राऊत यांनी नाणार प्रकल्पाला खो घालण्याचे काम केल्याची टीका काळसेकर यांनी केली. मागील निवडणुकीत सी-वर्ल्डबाबत राऊत यांनी अशीच विरोधाची भूमिका घेतली होती. बीएसएनएलच्या 104 टॉवरच्या कामाचे श्रेय, डायलेसीस मशीन आणण्याचे श्रेय, एलईडी बल्ब ही केंद्राची योजना आणण्याचे श्रेय राऊत यांनी घेण्याचा प्रयत्न केला, असे काळसेकर म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजनापूर्वी पुलांच्या कामांचे भूमिपूजन करण्याचा उतावीळपणा राऊत यांनी केला. मात्र, त्यांनी जी भूमिपूजने केली, ती चिपळूणपासून कुडाळपर्यंत सर्व पुलांची कामे बंद पडली. या कामांचे रिटेंडर करण्यात आले. त्यामुळे उतावीळपणे राऊत यांनी मांडलेला नाणार रिफायनरी विरोधाचा ठराव इतिवृत्तात न घेण्याची नामुष्की ओढवणार असल्याचे काळसेकर म्हणाले. विनायक राऊत यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी विसरू नये. 11 ऑक्टोबर रोजी नियोजनच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी सुरुवातीलाच जिल्हा नियोजनच्या वार्षिक योजनेशी संबंधित नसलेले ठराव मांडू नयेत, असे सांगितले होते. मात्र, राऊत यांनी या बैठकीत मागील बैठकीतील नाणार विरोधी ठराव का लिहिण्यात आला नाही, असा सवाल करीत पुन्हा नाणार विरोधी ठराव मांडला होता. मात्र, शासनाच्या आदेशान्वये हा ठराव चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याने तो रद्द करण्याची मागणी केल्याचे काळसेकर यांनी सांगितले.

Related posts: