|Saturday, March 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लष्करेचा दहशतवादी बांगरू ठार

लष्करेचा दहशतवादी बांगरू ठार 

जम्मू-काश्मीरच्या राजधानीत चकमक : एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा : एका जवानाला हौतात्म्य

वृत्तसंस्था/ श्रीनगर

 जम्मू-काश्मीरच्या फतेह कदाल भागात सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले असून यात लष्कर-ए-तोयबाचा क्रूर दहशतवादी मेहराज बांगरू देखील मारला गेला आहे. 3 दहशतवाद्यांच्या खात्म्यासह श्रीनगरमधील ही चकमक संपली असली तरीही शोधमोहीम सुरूच आहे. तर चकमकीत जवान कमल किशोर यांना हौतात्म्य आले आहे.

बांगरूचा खात्मा सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जातेय. बांगरूचा दीर्घकाळापासून शोध घेतला जात होता. बांगरू याच्या विरोधात हत्या, शस्त्र हिसकाविणे आणि दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे गुन्हे नोंद होते. तो श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. मे महिन्यात सुरक्षा दलांनी खोऱयात सक्रीय 10 दहशतवादी म्होरक्यांची यादी प्रसिद्ध केली होती. यात मेहराजचे नाव देखील सामील होते.

या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या उद्देशानेच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. बांगरूनंतर आता सुरक्षा दलांना रियाज नायकू, जाकिर मूसा आणि नावीद जट उर्फ अबू हंजाउल्ला यांचा शोध आहे. नावीद हा पोलीस कोठडीतून पळालेला पाकिस्तानी दहशतवादी आहे. या दहशतवाद्यांमुळेच खोऱयात सध्या संघर्ष सुरू आहे. या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची दोन शेणी करण्यात आल्या आहेत.

फतेह भागात चकमक

दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी शहराच्या गर्दीयुक्त फतेह कदाल भागात शोधमोहीम सुरू केली होती. मेहराज बांगरू याच्यासोबतच फहद वजा आणि रईस हे दहशतवादी लपून बसले होते. ज्या घरात चकमक झाली, त्या घराच्या मालकाचा रईस हा मुलगा होता.

रियाजवर नजर

पोलिसांच्या यादीत खोऱयातील हिजबुल म्होरक्यांमध्ये रियाज नायकू सर्वात क्रूर दहशतवादी आहे. त्याला पाकिस्तानसमर्थक मानले जाते तसेच देशविरोधी दुष्प्रचार करण्यास आघाडीवर आहे. पोलीस कर्मचाऱयांसह खोऱयातील अनेक हत्यांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. पोलिसांना दहशतवादविरोधी मोहिमांपासून दूर राहण्याची धमकी देणाऱया अनेक चित्रफिती त्याने प्रसारित केल्या आहेत. नायकूला हिजबुलच्या ओव्हर ग्राउंड वर्करचे (ओजीडब्ल्यू) मोठे समर्थन प्राप्त आहे. तर अन्सार गजावट-उल-हिंद ऑफ अलकायदाचा दहशतवादी जाकिर मूसा अत्यंत कमी कालावधीत काश्मीरच्या तरुणांमध्ये लोकप्रिय झाला आहे.

Related posts: