|Saturday, March 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लेखणी विरुद्ध घातपात

लेखणी विरुद्ध घातपात 

खींचो न कमान को ,ना तलवार निकालो,

जब तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो!

धनुष्यातून सुटणारा बाण, तलवारीची धार आणि बंदुकीची गोळी यांच्यापेक्षाही वर्तमानपत्रकर्त्यांची लेखणी तेज असण्याचा एक जमाना होता. त्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांच्या घावांनी घायाळ होऊन कुठे तोंड लपवावे, याची जागा शोधण्याची धावाधाव करणारे लोक गुन्हेगारी विश्वात असणे हे त्या जमान्याचे एक वैशिष्टय़ होते. जाडजूड भिंगांचे चष्मे लावणाऱया, झब्बा पायजम्यासारखा बावळा वेश करून खांद्याला शबनम पिशवी अडकवून पायातल्या परत परत बंद निघणाऱया स्लिपर झिजवत सर्वत्र संचार करणाऱया हडकुळ्या पत्रकारांच्या लेखणीच्या फटकारांना पुढारी घाबरत, उन्मत्त अधिकारी कचरत आणि गुंडागर्दी करणारे वचकून रहात. ते दिवस केव्हाच मागे पडले आहेत. संपूर्ण जगभर पत्रकारांच्या डोक्यावर घातपाताच्या टांगत्या तलवारी लटकू लागल्या आहेत. सौदी अरेबियाच्या इस्तंबूलमधील दूतावासात चौकशीला सामोऱया जाणाऱया जमाल खगोशी या पत्रकाराच्या बेपत्ता होण्याची ताजी घटना हे यातलेच एक उदाहरण आहे. खगोशी हा मूळचा सौदीचाच नागरिक. परंतु त्याने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. अमेरिकेतील ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या बलाढय़ वर्तमानपत्राचा तो प्रतिनिधी. साठ वर्षे वयाच्या या ज्येष्ठ पत्रकाराला आपल्या विवाहासंबंधातील कागदपत्रे हवी होती. त्यासाठी तो इस्तंबूल या तुर्कस्थानाची राजधानी असणाऱया महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शहरातील सौदी दूतावासात गेला होता. परंतु तो तेथून बाहेर आलाच नाही. तुर्कस्थानाचे म्हणणे असे की, त्याचे अपहरण करून सौदी अधिकाऱयांनी त्याला ठार केले. सौदीने अर्थातच प्रथम ही गोष्ट नाकारली. परंतु दूतावासातील चौकशीदरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचे मान्य करणारा अहवाल तयार करण्याचे काम लवकरच सौदी प्रशासनाने सुरू केले. या खगोशीसारखे आणखी किती पत्रकार आहेत आणि त्यांचे काय होत आहे, याचा ऊहापोह करणे हा या लेखाचा विषय आहे.खगोशीप्रमाणे गूढरितीने मरण पावलेले, ठार करण्याच्या धमक्या मिळालेले, निरनिराळ्या देशांतील तुरुंगात खितपत पडलेले आणि काहीच तपास न लागता बेपत्ता असलेल्या अशा पत्रकारांची संख्या अनेकांच्या बोटांनी मोजावी लागेल, एवढी मोठी आहे. एकटय़ा गेल्या वर्षात म्हणजे 2017 सालात अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सापडलेल्या पत्रकारांची संख्या 447 एवढी मोठी आहे. त्यापैकी दोघे बेपत्ता, 54 जण ओलीस, 65 जणांची हत्या झालेली आणि 326 जण कैदेत पडलेले अशी या संख्येची वर्गवारी आहे. त्यामध्ये पुरुष पत्रकार 85 टक्के आणि महिला पत्रकार 15 टक्के अशी पुन्हा विभागणी.

ही झाली एका वर्षाची तपशीलवार आकडेवारी. काही निरीक्षकांच्या मते 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये हत्या झालेल्या पत्रकारांची टक्केवारी 18 टक्क्यांनी घसरली होती, एवढेच काय ते समाधान! 2003 ते 2017 या पंधरा वर्षांच्या काळात 1035 व्यावसायिक पत्रकारांची हत्या झाली. दरवर्षी सरासरी 69 जण मारले गेले. मारले गेलेल्यांची संख्या 80 च्या पुढे गेलेली वर्षे चार- 2006 (85), 2007 (88), 2012 (87) आणि 2015 (81). यापैकी फक्त पहिल्या वर्षी म्हणजे 2003 साली पन्नासहून कमी म्हणजे 43 पत्रकारांची हत्या झाली. गेल्या वर्षी (2017 नेमके पन्नास मारले गेले.) एरव्ही 2010 मधले 58 वगळता कोणत्याही साली मृत्यू पावलेल्या पत्रकारांची संख्या साठच्या खाली उतरली नाही. यावरून पत्रकारांवरील टांगत्या तलवारींच्या धोक्याचे गांभीर्य लक्षात येईल.

पत्रकारांच्या या हत्या कोण करते आणि कोठे होतात? कशा होतात?

प्रामुख्याने यामागे असलेल्यांचे तीन गट पाडता येतील. एक-भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले राजकारणी, दोन-वेगवेगळ्या अवैध व्यवसायात गुंतलेले माफिया आणि तीन-सशस्त्र दहशतवादी. त्यांना मारण्यासाठी विमान अपघात, गोळीबार, आत्मघातकी बॉम्बस्फोट असे मार्ग वापरले गेले आहेत. अर्थात हा मार्ग वापरण्याचा अर्थ नीट लक्षात घ्यायला हवा. काही पत्रकार घडवून आणलेल्या विमान अपघातात अथवा आत्मघातकी बॉम्बस्फोटांनी घडलेल्या हत्याकांडात बळी पडतात. एकटय़ा पत्रकारासाठी आत्मघातकी स्फोट केला जाण्याचे कारण नाही. त्यासाठी गोळीबार अथवा सुरीहल्ल्याचा मार्ग वापरतात.

गेली चाळीस वर्षे भ्रष्टाचार आणि संघटित गुन्हेगारीबद्दल सातत्याने लिहिणाऱया कार्लोस डॉमिन्गझ या 77 वर्षांच्या ज्येष्ठ पत्रकाराला मेक्सिकोतील न्युवो लॅरेडो या शहरातील एका वाहतूक सिग्नलजवळ त्याच्या कुटुंबादेखत भोसकून मारले. 4 जानेवारी 2017 रोजी घडलेल्या या घटनेनंतर कुणालाही अटक झाली नाही.

पत्रकारांच्या हत्यांमध्ये सिरिया आणि मेक्सिको पहिल्या बाकांवर आहेत. यापैकी मेक्सिको हा युद्ध परिस्थितीपासून दूर असलेला देश. परंतु राजकीय अनागोंदीने पोखरलेला. तेथील अतिभ्रष्ट पुढारी आणि अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेले माफिया पत्रकारांना लक्ष्य बनवतात. या व्यापारासंबंधी विपुल लेखन करणाऱया एमिलिए गुटेरेझ या मेक्सिकन पत्रकाराने प्राणभयाने 2008 मध्ये अमेरिकेत आश्रय घेतला. 2017 साली त्याला ‘नॅशनल प्रेस क्लब’चे ‘फ्रीडम ऑफ प्रेस’ पारितोषिक मिळाले. परंतु त्याचवर्षी कस्टम अधिकाऱयांनी त्याला अटक करून मायदेशात पाठवण्याची धमकी सुरू केली.

मारले जात नाहीत ते तुरुंगात ठेवले जातात. त्यांचे हाल असह्य आहेत. महमूद अबू झैद या इजिप्शियन वृत्तपत्र छायाचित्रकाराला अशक्तपणामुळे नियमित नव्या रक्तबदलाची गरज असते, परंतु वर्षानुवर्षे तुरुंगात डांबला गेलेला झैद उपचार घेऊ शकत नाही. अशी कित्येक उदाहरणे आहेत. सतत युद्धग्रस्त असणारा सिरिया, येमेन, लिबिया या देशांसोबत अफगाणिस्तान, इराक, फिलिपाईन्स या देशांचाही पत्रकारांना छळण्यात वरचा क्रमांक लागतो. ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या एका वृत्तानुसार या बाबत भारत तिसऱया क्रमांकाचा देश आहे. अलीकडेच घडलेली गौरी लंकेश या महिला पत्रकाराची हत्या, 2015 मध्ये अवघ्या 24 तासांच्या काळात बिहारमध्ये राजदेव रंजन आणि झारखंडमध्ये अखिलेश प्रतापसिंग यांच्या झालेल्या हत्या आणि कित्येक पत्रकारांना सातत्याने मिळणाऱया धमक्या हे भारतासारख्या लोकशाही राष्ट्रातही पत्रकार असुरक्षित असल्याचे दर्शवतात.

पत्रकारांना डांबून ठेवण्यात तुर्कस्थान आघाडीवर आहे. बहुतेक देशांमध्ये दहशत माजवण्याचा आरोप त्यांच्यावर असतो आणि तेथील सरकारे जनतेचे शत्रू अशी त्यांची प्रतिमा रंगवतात. जुनाट आणि दमनकारी कायद्यांमध्ये काहीतरी निमित्त करून त्यांना अडकवले जाते. भारतासारख्या देशात लहान शहरात पत्रकारांच्या हत्या जास्त होतात आणि भ्रष्टाचारात बुडालेले दुसरीकडे, सिरियामधील विदेशी पत्रकारांची संख्या या घातपातामुळे घटू लागली आहे. अनाचार उघड करण्याऐवजी दोन देशांमधील युद्धांची वार्तांकने त्यांना सोयीची वाटू लागली आहेत. कदाचित तसे करण्याने वर टांगलेली तलवार कोणत्याही क्षणी डोक्यावर पडेल, याची शक्यता कमी झाल्याचे त्यांना वाटत असावे.

राजेंद्रप्रसाद मसुरकर,

Related posts: