|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वाचन संस्कृती : काही प्रश्न

वाचन संस्कृती : काही प्रश्न 

15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस उपकारक पद्धतीने ‘वाचनध्यास’ म्हणून साजरा करण्यात आला त्यानंतर आपल्या वाचन संस्कृतीबद्दलच असे काही प्रश्न पडायला लागले!

 

लेखक नेमके आपल्या साहित्यात काय लिहितो, समाज एकसंध राहावा म्हणून आपल्या लेखनातून कोणती जोखीम तो पत्करतो याचाशीही वाचक म्हणून आपले देणेघेणे हवे. एवढी समज वाचक म्हणून आपली वाढत नसेल, तर आपला भवताल आणि आपले जगणेही आपल्याला डोळसपणे वाचता आले नाही असे समजायला हवे. 15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस उपकारक पद्धतीने ‘वाचनध्यास’ म्हणून साजरा करण्यात आला त्यांनतर आपल्या वाचन संस्कृती बद्दलच असे काही प्रश्न पडायला लागले!

   महाराष्ट्राचे विद्यमान भाषामंत्री विनोद तावडे यांच्या ‘निर्णयाचे विनोद’ तसे प्रसिद्ध आहेतच. मध्यंतरी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचा सेल्फी शिक्षकांनी शिक्षण खात्याला पाठविण्याची कल्पना जाहीर केली. अर्थात ती नेहमी प्रमाणे फसलीच. आता माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांच्या जन्मदिनी साजऱया करण्यात येणाऱया वाचन प्रेरणादिनी त्यांनी ग्रंथालयापासून मंत्रालयापर्यंत सर्वांना वाचनध्यास लावण्याची कल्पना मांडली. त्यांच्याच मंत्रायातील कर्मचाऱयांनी या उपक्रमात सहभागी होऊन किमान एक तास वाचन करावे असे अपेक्षित होते, मात्र मंत्रालयाच्या दारी माय मराठी आनंदली पण ती कर्मचाऱयांच्या ग्रंथ वाचनालयाने नव्हे तर मोफत पुस्तकासाठी वाचक कर्मचाऱयांची झुंबड उडाल्याने. असो. पण दरकाळात ग्रंथ वाचकांची संख्या कमी कमी होत जात असल्याचा आरोप होत आहे. पण ज्या काळात साहित्य ग्रंथ वाचले जातात ते तरी समकालीन जीवनानुभव देणारे वाचले जातात का हा खरा प्रश्न आहे. बहुसंख्येने ग्रंथ वाचन करणे आणि त्याच्याशी आपल्या जगण्याचा अन्वयार्थ लावणे या अर्थाने आपल्याकडील वाचन संस्कृती फार श्रीमंत होती असे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल. बदलत्या जगण्याबरोबर साहित्य लेखनही बदलत असते. प्रगल्भ लेखक त्याच जगण्याला शब्दबद्ध करत पुढे त्याची कथा, कादंबरी, कविता करतो. पण अशा लेखनाला त्या त्या काळात सर्वस्तरातील वाचकांकडून प्रतिसाद मिळतोच असे नाही. त्यामुळे लेखकाबरोबर वाचकही प्रगल्भ होत जायला हवा. हे एकदा समजून घेतले की अशा भाषा आणि त्या भाषेतील साहित्य प्रेमाच्या दिवसांचा तकलादूपणा काय असतो आणि तो फक्त राजकीय शायनिंग पुरताच कसा मर्यादित असतो हेही लक्षात येते. त्यामुळेच ‘काय वाचले पाहिजे, काय नको याबाबत वाचकही साक्षर होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण जे वाचतो त्याचे आपल्या जगण्याशी प्रयोजन काय असा प्रश्न वाचकाला पडायला हवा. असे झाले नाही तर आपण जे वाचतो ते म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा ठरण्याची शक्मयता अधिक राहते. ग्रंथवाचन म्हणजे त्या त्या काळाचे प्रश्न समजून घेणे. आणि तो गुंता सोडविण्यासाठी माणूस म्हणून आपण अधिक समृद्ध होत जाणे. या विचाराची     प्रक्रिया आपल्या डोक्मयात वाचक म्हणून ग्रंथवाचना आधीपासूनच सुरू रहायला हवी किंवा आपण त्यासाठी ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेत असतो. एवढा तरी विचार आपल्या मनात पक्का झालेला असायला हवा. असे झाले नाही तर आपले वाचन एक मनोरंजन ठरू शकते. वाचनात आपल्या मनाची एकाग्रता जेवढी महत्त्वाची असते किंबहुना त्याहीपेक्षा कितीतरी पटीत आपण का वाचतो? कशासाठी वाचतो? त्यातून आपल्याला कोणता विचार स्वीकारायचा आहे आदी विचार चिंतन महत्त्वाचे असते. मात्र तेच होत नसल्याने वाचन हे एक वेळकाढू साधन बनून जाते. मग अशा प्रकारच्या वाचनातून हाती काहीच सापडत नसल्यामुळे वाचकाला एका ठरावीक मर्यादेनंतर ग्रंथ वाचनाच्या सवयीचा कंटाळाही येण्याची शक्मयता असते. कविता, कथा साहित्याचा प्रारंभ मौखिक परंपरेतूनच झाला. अनेक लोकगीते मौखिक परंपरेतून शेकडो वर्षे आपल्यापर्यंत पोहचली. आपल्याकडे शिक्षण आणि लेखन संस्कृती एकाचवेळी सुरू झाल्याची काही उदाहरणे सापडतात. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. मुक्ता साळवे या मुलीला गेणपटात बांधून तिच्या वाडलांनी सावित्रीबाईंच्या शाळेत आणले. पुढे मुक्ताने बालपणीच निबंध लिहिला. डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या महिल्या डॉक्टर, पण  प्रत्यक्षात डॉ. रखमाबाई सावे यांनी या देशात डॉक्टर म्हणून पहिली रुग्ण सेवा केली. मात्र वाचक म्हणून बहुसंख्येने याची माहिती नसते. म्हणूनच वाचकांनी साक्षर होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या वाचनातून जे आपल्यापर्यंत येते त्याला आपल्या जगण्याचा अर्थ लावता यायला हवा. हे या अर्थानेच असते. ते लक्षात येत नसल्याने वयाच्या पन्नाशीनंतरही आपण 18-20 वयात जे ठरावीक लेखकांचे लेखन वाचत होतो अशाच लेखकांच्या कथा-कादंबऱयात वाचक म्हणून आपण अडकलेलो असतो. आपण ज्या लेखकाचे लेखन वाचतो त्या लेखनातील जीवन जाणिवा आपल्या नाहीत. आपण फक्त वाचावे. आणि ते त्यांचे जगणे आहे असे संबोधून आपल्या जगण्याला त्या लेखन अनुभवाशी स्वतःला पडताळून पाहण्याची विचार प्रक्रिया आपल्यात सुरू न ठेवणे म्हणजे वाचक म्हणून आपण आपल्यालाच पुनर्जीवित न करणे होय! वास्तविक वाचक म्हणून लेखकाने जे अनुभव विश्व लेखनात मांडले आहे ते आपण समजून घेताना माणूस वेगवेगळय़ा स्तरात जगत असला तरी त्या जगण्याच्या मुळाशी दु:ख-वेदना, अपार करुणा असल्याची भावना जोपर्यंत आपल्या मनात रुजण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवत नाही तोपर्यंत ते त्यांचे जगणे असे म्हणून अमुक एका समाजाचे चरित्र आणि चारित्र्य म्हणूनच आपण त्या लेखनाकडे पाहत राहणार. वाचक म्हणून आपण घडत जाताना आपल्या मनात विविध प्रकारची विचार प्रक्रिया सतत चालू रहायला हवी. यातूनच मग लेखकाच्या विचार संस्कृतीशी आपली बांधीलकी वाढत जाते. लेखकाची विचार संस्कृती म्हणजे लेखक प्रत्यक्ष लिहितो आणि त्या लिहिण्याची भूमिका जाहीरपणे घेतो याच्याशी आपले वाचक म्हणून किंवा एक माणूस म्हणून काय नाते असते असा प्रश्न सतत वाचकाच्या मनात निर्माण व्हायला हवा. तसा   प्रश्न आपल्या मनात वाचक म्हणून निर्माण होत नसेल तर एकूण समाजाचीशी आपले माणूस म्हणून काही देणेघेणे नाही, याचा ‘संधी कोपरा’ आपल्या मनात कुठेतरी दडून बसला आहे असे आपणच आपल्याला समजून सांगायला हवे. लेखकाची विचार संस्कृती ही एकूण माणसाकडून माणसाकडे जाणारी हवी. लेखकाच्या लेखनात त्याची बिजे दिसत नसतील आणि आपल्या लेखनातून लेखक भेदाच्या भिंती उभ्या करत असेल तर तो लेखक म्हणून दुबळा आहे असे बोट दाखवण्याची समजही आपल्यात वाढायला हवी. लेखकाच्या विचार संस्कृतीशी  वाचक म्हणून आपण बांधीलकी ठेवतो तेव्हाच आपल्यात अशी समज निर्माण  होण्याची शक्यता असते. लेखकाने लिहावे, त्याने जाहीर भूमिका घ्यावी, त्याने समाजासाठी लढावे आपले काय त्याच्याशी? आपण त्याचे लिखित साहित्य वाचावे,  त्याने समाजातील अंतर्विरोध मांडले त्यातील प्रत्यक्ष जगण्याशी आपले काही देणेघेणे नाही असे समजून आपण ग्रंथांचा जर आस्वाद घेत असू तर आपल्या मेंदूची इयत्ता पहिली ते पहिलीच आयुष्यभर राहिली असेच समजायला हवे!

अजय कांडर