|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी

संशोधकांनी अनुभवली ‘तिलारी’ची समृद्धी 

विज्ञान शाखेचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या टीमची भटकंती

तेजस देसाई / दोडामार्ग:

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात विस्तीर्णपणे पसरलेले  तिलारीचे जंगल अनेक अभ्यासकांसाठी दिवसेंदिवस अभ्यासाचा केंद्रबिंदू ठरते आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ, संशोधक तसेच निसर्ग अभ्यासक तिलारीच्या या जंगलात आपल्याला हवे असलेले निसर्गज्ञान घेण्यासाठी येतात. सावंतवाडी व दोडामार्ग महाविद्यालयातील काही प्राध्यापक, निसर्ग अभ्यासक, प्राणीशास्त्र अभ्यासक तसेच विज्ञान शाखेतील विद्यार्थी यांच्या एका समूहाने अलिकडेच तिलारीच्या घनदाट जंगलाची सफर केली. या जंगल सफरीदरम्यान त्यांना दुर्मीळ
प्रजातींचा, निसर्गाचा अभ्यास करता आला. त्याचबरोबर या जंगलातील जैवविविधता, प्राणी-प्रजाती यांनाही जवळून अनुभवता आले.

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शेवटच्या टोकावर असलेला तिलारी परिसर हा तेथील आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प तसेच कर्नाटकातून काही वर्षांपूर्वी आलेल्या रानटी हत्तींचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी या परिसरातील रानटी हत्तींना हाकलून लावण्यासाठी राबविण्यात आलेला ‘एलिफंट बॅक टू होम’ या मोहिमेमुळे हत्तींसोबत तिलारीचे जंगल विशेष प्रकाशझोतात आले. कारण या मोहिमेवेळी राज्याच्या व देशाच्या अनेक भागातून वनविभागातील मोठमोठे अधिकारी, प्राणी शास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ या जंगलात आले होते. त्यांनी या जंगलाचे अनेकप्रकारे अवलोकन करून येथील जंगलसंपदा, प्राणी, पशू यांच्या विविधतेबद्दल कौतुक केले होते. येथूनच तिलारीतील जंगल संपदेबाबत बोलबाला झाला.

 सिंधुदुर्गातील अभ्यासक, शास्त्रज्ञ तिलारीच्या दिशेने

दुर्मीळ प्रजातींचा, निसर्गाचा तसेच जैवविविधता, मुबलक प्राणी प्रजाती यांचा अभ्यास करण्यासाठी किंबहुना या माध्यमातून जंगल सफर करण्यासाठी सावंतवाडी व दोडामार्गमधील अनेकजण नुकतेच तिलारीच्या या घनदाट जंगलात दाखल झाले. सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्गमधील आमदार दीपक केसरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडसे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख सोनाली मेस्त्राr, सहाय्यक प्रा. जयदीश सावंत, राजू नाईक व पंचम खेमराज महाविद्यालयातील
विज्ञान शाखेचे (प्राणीशास्त्र) अनुराग सिनारी व अक्षय धाऊसकर हे दोन विद्यार्थी अशी ही टीम होती. या टीमने तिलारीच्या जंगल सफरीत सापडलेला दुर्मीळ खजाना तसेच काही थरारक अनुभव ‘तरुण भारत’कडे मांडले.

बिबटय़ासोबत मलबार ट्रॉगन व इंडियन ग्रेट हॉर्नबिलचेही दर्शन

तिलारी परिसरातील हेवाळे गावचे जंगल व दोडामार्गातील कसईनाथ डोंगर अशा दोन ठिकाणी सलग दोन दिवस आपल्या अभ्यासदौऱयाचे नियोजन केलेल्या या टीमचा हेवाळेमधील जंगलात सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास प्रवेश झाला. या टीमकडे हायपॉवरचा मायक्रोलेन्स कॅमेरा, मॉनोपॉड, दुर्बीण, टॉर्चसह काठी व किरकोळ हत्यारे असलेले ‘सेफ्टी कीट’ होते.

जंगल सफर करतांना एखाद्या वन्यश्वापदाशी दोन हात करायची वेळ आल्यास त्यादृष्टीने उपयोगी ठरणारे ‘सेफ्टी कीट’ त्यांनी बाळगले होते. हेवाळेच्या जंगलात फिरतांना त्यांना बिबटय़ाचे ठसे प्रामुख्याने आढळले. त्याचबरोबर साळिंदर, सांबर यांच्या पायाचेही ठसे आढळले. विशेष म्हणजे मलबार ट्रॉगन (मलबारी कर्णा) हा पक्षी त्या ठिकाणी मुक्तपणे संचार करतांना दिसून आला. मूळ केरळ व दक्षिणेकडील भागात आढळणारा हा ‘मलबार ट्रॉगन’ तिलारी हेवाळेच्या जंगलात आढळला हे विशेष. वाघ तसेच अन्य प्राण्यांचे ठसे व मलबार ट्रॉगन यांचे फोटो काढण्याचा मोह या टीमला आवरता आला नाही. शिवाय इतर पक्षी-प्राणी प्रजाती यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा आढळल्याने या टीमचा उत्साह द्विगुणित झाला.

दुसऱया दिवशी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ही टीम दोडामार्ग शहरालगतच्या कसईनाथ डोंगरावर दाखल झाली. तेथेही मलबार ट्रॉगनसोबत इंडियन ग्रेट हॉर्नबिलचे (महा धनेश) दर्शन झाले. घनदाट जंगल व महाकाय वृक्ष यांच्या सानिध्यात असलेला हा ‘इंडियन ग्रेट हॉर्नबिल’ कसईनाथ डोंगर परिसरातील आंबेली येथे ‘उंबर’ झाडाची फळे खातांना आढळला. यासोबत इतर अनेक दुर्मीळ पक्षी, प्रजाती यांचेही दर्शन या टीमला झाले.

हेवाळेतील जंगलात या टीमने सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत तर कसईनाथ डोंगरावर सकाळी 5.45 ते 3.30 वाजेपर्यंत भटकंती केली. जैवविविधतेने तसेच मुबलक प्राणी-पशू प्रजाती तसेच अनमोल, अद्भूत निसर्ग असलेले तिलारीचे जंगल व कसईनाथ डोंगर अभ्यासासाठी एक उत्तम व अनमोल ठिकाण असल्याचे या टीमने सांगितले.

तिलारीच्या जंगलात अनेक अद्भूत आश्चर्ये – प्रा. डॉ. मर्गज

पक्षांमध्ये दुर्मीळ प्रजाती म्हणून ओळखला जाणारा इंडियन ग्रेट हॉर्नबिल तसेच अन्य पक्षी अशी समृद्धता या जंगलात पाहायला मिळाली. विशेषत: हॉर्नबिलचे वास्तव्य खरोखरच सुखावह आहे. अशा अनेक दुर्मीळ पक्षी प्रजातींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. इतर जंगलाच्या तुलनेत तिलारीचे जंगल सध्यातरी घनदाट असून या ठिकाणी दुर्मीळ प्रजातींचे अस्तित्व टिकून राहायचे असेल तर इथली वनसंपदा टिकविली पाहिजे, असे या अभ्यास मोहिमेचे प्रमुख डॉ. मर्गज यांनी सांगितले.

‘त्या’ वनमानवाचा शोध घेणार!

तिलारीच्या या जंगलात बहुचर्चित वनमानव अर्थात ‘स्लेंडर लोरीस’चा वावर असल्याचे ऐकायला मिळते. वनमानव हे सध्याधरी एक आगळेवेगळे कुतूहल असून विशेषत: रात्रीच्या वेळीच माकडसदृश दिसणाऱया या वनमानवाचा शोध व अभ्यासासाठी आम्ही लवकरच पुन्हा एकदा या जंगलात येणार असल्याचे डॉ. मर्गज यांनी सांगितले.

Related posts: