|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालय कुडाळमध्ये

‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालय कुडाळमध्ये 

100 खाटांचे होणार रुग्णालय : जागा निश्चितीला पालकमंत्र्यांनी दिला दुजोरा

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्गमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्हय़ात हे रुग्णालय कुठे होणार? याबाबत निश्चिती नव्हती. मात्र, आता कुडाळ येथील महिला-बाल रुग्णालयाच्या परिसरातील जागेवर 100 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय (मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल) सुरू करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलसाठी कुडाळ येथे जागा निश्चित करण्यात आल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही स्पष्ट केले आहे. यासाठीचे अंदाजपत्रक सादर करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात हृदयविकार, मेंदूविकार, मूत्रविकार, कॅन्सर आदी प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही होणार आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्गमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अर्थसंकल्पातील ही घोषणा प्रत्यक्षात कधी येणार? याबाबत मात्र निश्चिती नव्हती.

कुडाळला जागा निश्चित

दरम्यान, जिल्हय़ात होणारे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीत सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा होत होती. या रुग्णालयासाठी सावंतवाडीसह, कुडाळ येथील उपलब्ध जागेबाबतही चाचपणी करण्यात आली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात सावंतवाडी येथेच हे रुग्णालय सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, आता हे रुग्णालय सावंतवाडीत नव्हे, तर कुडाळ येथे होणार असल्याचा अंतिम निर्णय झाला आहे. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनीही मल्टिस्पेशालिटी रुग्णालय कुडाळ येथे होणार असून त्यादृष्टीने पुढील कार्यवाहीही सुरू झाली असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

100 खाटांचे रुग्णालय

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाच्या परिसरात हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. कुडाळ येथील जागेची निश्चिती करताना कुडाळ ग्रामीण रुग्णालय व महिला व बाल रुग्णालय यादृष्टीने विचार करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेपेक्षा महिला व बाल रुग्णालयाचे काम सुरू असलेली जागा अधिक आहे. ही जागा साधारणत: अडिच एकर असल्याने या उर्वरित जागेत हे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयात कार्डिओलॉजी व कार्डिओथोरेसिक सर्जरी या विभागासाठी 25 खाटा, न्युरॉलॉजी व न्युरोसर्जरी या विभागासाठी 25 खाटा, नॅफ्रोलॉजी व युरॉलॉजी या विभागासाठी 25 खाटा, तर कॅन्सर उपचार-ऑनकॉलॉजी व ऑनको-सर्जरी या विभागासाठी 25 खाटा असणार आहेत. या विभागांसाठी 100 खाटांचे हे संदर्भ सेवा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देतानाच तेथील उपलब्ध जागेवर बांधकाम करण्यासाठी अंदाज आराखडे तयार करण्यास सांगण्यात आले आहेत.

रुग्णालय सुरू होण्यास काही वर्षे लागणार

या संदर्भ सेवा रुग्णालयात निश्चित करण्यात आलेल्या विभागांनुसार उपचार करण्यात येणार असून त्यानुसार बांधकाम आराखडे तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयासाठीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पदनिर्मिती करून रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या साऱयाला आणखीन काही वर्षे लागणार असली, तरीही जिल्हय़ात मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्यादृष्टीने अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार रुग्णालय होण्याच्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.