|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » साडेपाच लाखाची दारू जप्त

साडेपाच लाखाची दारू जप्त 

इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई : करवीरच्या दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी / बांदा:

गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारुची विनापरवाना वाहतूक करणाऱया आयशर टेम्पोवर इन्सुली तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 5 लाख 52 हजार 600 रुपयांच्या दारुसह 7 लाखांचा आयशर टेम्पो असा 12 लाख 52 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी विशाल रघुनाथ पाटील (32, वाशी-देऊळवाडी, करवीर- कोल्हापूर) आणि शिवाजी गोविंद पाटील (31, शिवाजी गल्ली, हळदी, करवीर- कोल्हापूर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास करण्यात आली.

बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने दारू वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार इन्सुली तपासणी नाक्यावरील कॉन्सटेबल प्रमोद नाईक यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आयशर टेम्पो (एमएच-09/1130) तपासणीसाठी थांबविण्याच्या सूचना केल्या. दुपारी पावणेएकच्या सुमारास सदर टेम्पो आला असता येथील कर्मचारी नाईक आणि महेश भोई यांनी थांबण्याचा इशारा केली. चालकाने टेम्पोत भंगार असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता भंगाराच्या आड दारुचे बॉक्स असल्याचे उघड झाले. गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या दारुचे 135 बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते.

सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तर चालक आणि क्लीनरवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर, प्रमोद नाईक, महेश भोई, प्रीतम कदम, दिलीप धुरी, संजय कदम, महेश पावसकर, महेंद्र बांदेकर, विजय मालवणकर, संजय कोरगावकर यांनी केली.

Related posts: