|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » क्लीनर मानेचा खून गळा आवळून

क्लीनर मानेचा खून गळा आवळून 

वैद्यकीय अहवालात स्पष्ट : फॉरेन्सिक पथकाकडूनही तपासणी : सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लीनरसोबत दोन-तीन व्यक्ती : क्लीनर ट्रकचा ताबा बेळगावला देणार होता चालकाकडे : आंबोली पोलीस तपासासाठी हुपरीत

वार्ताहर / आंबोली:

आंबोली-जकातवाडी येथे ट्रकमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या क्लीनर रजनीकांत गणपती माने (37, रा. हुडको कॉलनी, खानापूर) याचा गळा दाबून खून झाल्याचा प्राथमिक अहवाल आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. श्वेता शिरोडकर यांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी हुपरी येथील साखर कारखान्याचे तसेच किणी आणि हत्तरगी अशा तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यात साखर कारखान्याकडून बाहेर पडतांना क्लीनरसोबत दोघेजण तर अन्य ठिकाणी क्लीनरसोबत तिघेजण असल्याचे दिसत आहे. या सर्वांची पोलीस चौकशी करत आहेत. ट्रकचे दोन चालक व मालक यांचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, ट्रकचे मालक अब्दुल मुल्ला यांनी हा प्रकार नियोजनबद्ध करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार चालक तौशिक हुकेरी हा केरळला साखर नेण्यासाठी हुपरी येथील कारखान्यात शनिवारी गेला होता. त्या दिवशी व दुसऱया दिवशी रविवारी ट्रकमध्ये साखर भरली नव्हती. त्यामुळे चालक तौशिक हुकेरी बेळगावला आला होता. क्लीनर रजनीकांत माने साखर घेऊन बेळगावला येणार होता. तेथे तो तौशिक याच्याकडे ट्रकचा ताबा देणार होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तर साखर सोमवारी ट्रकमध्ये भरण्यात आली होती. त्यामुळे क्लीनरचा खून सोमवार अथवा मंगळवारच्या दरम्यान झाल्याचा संशय आहे.

क्लीनर माने गेला होता हुपरीत

आंबोली जकातवाडी येथे उभा असलेला ट्रक बुधवारी नागरिकांच्या दृष्टीस पडला. त्यांनी याबाबत पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये मृतदेह आढळला होता. चौकशीत हा मृतदेह खानापूर येथील रजनीकांत माने याचा असल्याचे स्पष्ट झाले. माने हा तौशिक हुकेरी याच्यासोबत केरळला साखर नेण्यासाठी हुपरी साखर कारखान्यात गेला होता.

गुरुवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आणि ठसेतज्ञ पथक तसेच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे जमा केले. यावेळी सरकारी पंच उपस्थित होते. त्यांच्यासमोरच इनकॅमेरा पंचनामा करण्यात आला. यावेळी ट्रकची आतून आणि बाहेरून तपासणी करण्यात आली. खुनाच्या तपासकामात अत्यंत महत्त्वाची समजल्या जाणाऱया फॉरेन्सिक टीमला या तपासकामात पाचारण करण्यात आले होते. त्यांनी तपासकामात जेवढे महत्त्वाचे पुरावे आहेत ते गोळा केले.

नातेवाईकांचा चालकावर संशय

या तपासकामावेळी आंबोलीत घटनास्थळी हजर असणाऱया क्लीनर रजनीकांत याच्या नातेवाईकांनी चालकावरच संशय व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रक मालकाजवळ दोन खास चालक होते. मग त्या क्लीनरला ट्रक घेऊन साखर भरण्यास का पाठविले? यावेळी ते दोन चालक कोठे होते? त्यामुळे त्या चालकांची कसून चौकशी करावी.

ट्रकमध्ये दोन-तीन व्यक्ती

ज्यावेळी ट्रक साखर भरून हुपरी कारखान्यातून बाहेर पडला त्यावेळी तेथील सीसी फुटेजमध्ये ट्रकमध्ये क्लीनर वगळता दोन प्रवासी होते. त्यावेळी क्लीनरला विचारणा केली असता ते प्रवासी असल्याचे त्याने सांगितले होते. ट्रक पुढे आल्यानंतर मालाची पावती ट्रकचालकाला नजीकच्या पेट्रोल पंपावर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ट्रक पुढे जाताच किणे येथील टोलनाक्यावर ट्रकमध्ये क्लीनर वगळता तीन माणसे असल्याचे फुटेजमध्ये दिसते. हत्तरगी पोलीस चेकपोस्टवर हा ट्रक आल्यावर सीसी फुटेजमध्ये चालकाव्यतिरिक्त तीन माणसे असल्याचे दिसून येते. मग ही माणसे कोण होती? ते खरोखरच प्रवासी होते का, याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच ती पुढे कोठे उतरली? ट्रकमधील दहा लाख किमतीच्या साखरेचे काय झाले, याचाही तपास पोलीस करत आहेत.

आंबोली पोलीस हुपरी येथे रवाना

रजनीकांत माने याच्या खुनाचा तपास करण्यासाठी आणि पुरावे जमा करण्यासाठी आंबोली पोलीस सकाळी हुपरी, हत्तरगी, किणे टोलनाका येथे रवाना झाले आहेत. तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले जाणार आहे. त्यातून धागेदोरे मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. तसेच पेट्रोल पंपावरही चौकशी करण्यात येणार आहे.

घटनास्थळी सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत, पोलीस नाईक गवस, पोलीस नाईक भोगण, ओरोस पोलिसांचे ठसेतज्ञ, पोलीस पाटील विद्या चव्हाण यांनी भेट दिली. सायंकाळी उशिरा ओरोसचे पोलीस उपअधीक्षक आणि त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ती साखर व्यापाऱयाची

हुपरी येथील कारखान्यातून केरळ येथे नेण्यात येणारी साखर एका व्यापाऱयाने खरेदी केली होती. त्यामुळे या साखरेशी कारखान्याचा काही संबंध नाही. व्यापाऱयाने साखरेबाबत तक्रार द्यावी, असे कारखान्याकडून सांगण्यात आले.