|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम

शिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम 

विजयादशमीदिवशी पालख्यांची मिरवणूक

प्रतिनिधी/ बेळगाव

जोतिबाच्या नावानं चांगभलं, बम बम भोले, शिव शिव भोले, जय जय रामकृष्ण हरी, दुर्गामाता की जय, हरी ओम विठ्ठला च्या जयघोषात विजयादशमीदिवशी पारंपारीक महत्व लाभलेल्या पालख्यांची मिरवणुक पार पडली. मिरवणुकीनंतर मराठी विद्यानिकेतन येथील शिलंगण मैदानावर पालख्यांचे सीमोल्लंघन करुन सोने लुटुन दसरोत्सव साजरा करण्यात आला. बेळगाव शहर देवस्थान कमिटीतर्फे गुरुवारी मराठी विद्यानिकेतनच्या शिलंगण मैदानावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. भक्तांचा उत्साह, मैदानाला आलेले जत्रेचे स्वरुप, सोने लुटणे, शस्त्रांचे पुजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दसरोत्सव साजरा करण्यात आला. अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत सोने लुटण्यासाठी शहरवासियांची प्रचंड गर्दी झाली होती.

प्रारंभी सकाळी चव्हाट गल्ली येथील जोतिबा देवाची व नंदीची पुजा करण्यात आली. आमदार अनिल बेनके, नगरसेवक पुंडलिक परीट, रणजित चव्हाण पाटील, परशराम माळी, विजय तमुचे चव्हाट गल्ली पंच कमिटी तसेच शहर देवस्थान कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत पुजा करुन मिरवणुक मार्गस्थ झाली. सायंकाळी पाच वाजता विविध मंदिरातील पालख्या हुतात्मा चौकात मार्गस्थ झाल्या. कपिलेश्वर मंदिरातील कपिलेश्वर देवाची पालखी, मारुतीचे वाहन, बनशंकरी देवीची पालखी , कोलकामा देवी, मातंगी देवीची पालखी सुरेश पुजारी व बाबु पुजारी यांच्या हस्ते पुजन करुन मार्गस्थ झाली. याशिवाय श्री विठ्ठलदेवाची पालखी, बसवाण गल्लीतील बसवाणाचे वाहन (मोरे कुटुंबिय) तसेच विविध देवाच्या पालख्या हुतात्मा चौकात एकत्रित आल्या. चव्हाट गल्लीतील जोतिबा मंदिराची सासण काठी व नंदी अग्रस्थानी ठेवत पालखी मिरवणुक मैदानाकडे मार्गस्थ झाली.

शिलंगण मैदानावर बेळगावचे वतनदार पाटील घरण्याकडे असलेल्या तलवारीचे तसेच शस्त्रांचे पूजन बळवंत पाटील यांच्या पौरोहित्याखाली रणजित चव्हाण पाटील व कुटुंबिय यांच्या हस्ते करण्यात आले. गल्लीतील पंचमंडळी, खडेबाजारचे जाधव कुटुंबिय उपस्थितीत होते. यावेळी पोलिस आयुक्त राजाप्पा तसेच आमदार अनिल बेनके यांनी मैदानाला भेट दिली. कटल्या मैदानावर येताच सीमोल्लंघन करुन सोने लुटण्यात आले.  ढोलताशांचा गजर, भक्तांचा उत्साह, देवांचा जयघोष, पालख्यांच्या दर्शनाची आस, सोने लुटण्यासाठीची घाई अशा उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात सीमोल्लंघन झाले.

सीमोल्लंघन होताच  महाआरती करण्यात आली. यानंतर विविध पालख्या मंदिराकडे मार्गस्थ झाल्या. यावेळी भक्तांची मोठया प्रमाणात उपस्थीत होती. विविध गल्लीतील देवाच्या पालख्या घेऊन आलेल्या भक्तांनी सोने लुटण्याचा आनंद घेतला. परस्परांना दसऱयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, रात्री उशीरापर्यंत शिलंगण मैदानावर दसरोत्सवाचा उत्साह दिसून आला.

 शिलंगण मैदानाला जत्रेचे स्वरुप

सीमोल्लंघनामुळे शिलंगण मैदानाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सायंकाळी 5 पासून मैदान गर्दीने फुलुन गेले होते. सीमोल्लंघन होताच घरातून आणलेला खाऊ तसेच  बेळगावचा वैशिष्टयपुर्ण पदार्थ आलीपाक चुरमुरे एकत्रित बसून खाण्याचा आनंद लुटण्यात आला. मैदानावर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळण्याचे साहित्य , मल्लखांबचे प्रात्याक्षिक, लहान मुलांसाठी घोडे स्वारी, छोटी मोठी खेळणी असे खेळ व मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध असल्याने दसरोत्सवाच्या निमित्ताने बेळगावकरांना जत्रा अनुभवायला मिळाली. याठिकाणी पडलेला कचरा एकत्रित करण्याच्या दृष्टीने जायंटस् ग्रुप तर्फे मैदानावर कचरापेटाची व्यवस्था करण्यात आली होती.  मैदानावर कचरा पडू नये यासाठी 12 कचरापेटया विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या.

Related posts: