|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता

चैतन्यमय वातावरणात दौडीची यशस्वी सांगता 

प्रतिनिधी/ बेळगाव

भगवेमय वातावरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, अशा प्रसन्न व उत्साही वातावरणात दसरोत्सवादिवशी शहरात दौडीच्या निमित्ताने चैतन्य आणि प्रेरणेचा आविष्कार अनुभवयाला मिळाला. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या दौडीचा सांगता समारंभ गुरुवारी पार पडला. शिवप्रति÷ान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडीत शेवटच्या दिवशी शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दौडीला प्रारंभ झाला. माजी महापौर सरीता पाटील, शंकरराव भातकांडे, आरती मोरे यांच्या हस्ते मारुती मंदिरात आरती करून दौडला सुरुवात झाली. दौडीतील शिवभक्तांचा सळसळता उत्साह, बेळगावकरांनी शिवभक्तांचे केलेले स्वागत, दारोदारी रेखाटण्यात आलेल्या रांगोळय़ा, स्वागत कमानी, ठिकठिकाणी शिवपुतळय़ाचे पूजन अशा शिवमय वातावरणात दौड पार पडली.

दौडीला मारुती गल्ली येथून प्रारंभ झाला. नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, संयुक्त महाराष्ट्र चौक, शनिवार खुट, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, कंग्राळ गल्ली असे मार्गक्रमण करत काकतीवेस रोड मार्गे, विविध गल्ल्यांमधून कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली आदी मार्गे धर्मवीर संभाजी चौकात दौडीची सांगता झाली. दौडीच्या मार्गावर शिवचरित्रावर आधारीत विविध देखावे सादर करण्यात आले. महिलांवर्गाकडून दौडीचे स्वागत करून आरती करण्यात आली.

दौडच्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मिरज येथील शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे धारकरी व थायलंड येथील गुहेत अडकलेल्या मुलांना वाचविण्याचे कार्य केलेले प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. व्यासपीठावर उद्योजक शिरिष गोगटे, माजी महापौर सरिता पाटील, माजी महापौर संज्योत बांदेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, शहरप्रमख अजित जाधव, तालुका प्रमुख परशराम कोकीतकर, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे प्रसाद कुलकर्णी व उद्योजक शिरिष गोगटे यांच्या हस्ते शिवपुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी यांनी, शिवचरित्र वाचून अनेक राष्ट्रे मोठी झाली असून हिंदुस्थानी व्यक्तींच्या अंत:करणात शिवाजी महाराज विराजमान झाल्याखेरीज सुवर्ण हिंदुस्थानाची निर्मिती होणार नाही. यामुळे शिवशाही मूल्यांची जोपासना करून त्यांचे विचार रक्तात भिनले पाहिजेत. तेव्हाच आपले राष्ट्र सक्षम व महासत्ता बनेल, असे नमूद केले. शिवप्रभूंचे आयुष्य 280 महिन्यांचे होते. यामध्ये त्यांनी 289 लढाया लढल्या. शिवप्रभूंच्या जीवनात दौड आणि दौडच होती. शत्रूंच्या अंत:करणातही शिवरायांचा दरारा होता.

 या दौडच्या निमित्ताने शिवतीर्थावर एकत्र जमायचे. शिवरायांना मानाचा मुजरा करायचा आणि आईचे दर्शन घेऊन शक्ती दे म्हणत राष्ट्राला मोठे करण्यासाठी लढायचे, शिवप्रभूंच्या कार्याचे पाईक बनण्याचे सामर्थ्य, राष्ट्ररक्षण करण्याची शक्ती, ताकद एकवटण्यासाठी ही दौड असल्याचे त्यांनी सांगितले. इंग्लंडमधील म्युझियम, इराणच्या राजापर्यंत शिवरायांची कीर्ती, निकोलस मनुची या अभ्यासकाचे मत अशी उदाहरणे देत विदेशांनी शिवरायांच्या बाबतीत गौरवोद्गार काढले असल्याचे सांगितले. शिवप्रभू रक्तात भिनले पाहिजेत तेव्हाच राष्ट्र सक्षम व महासत्ता बनेल. सुवर्ण सिंहासनासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे, असे आवर्जुन सांगत यातून एकता दिसून येईल आणि शिवतीर्थाला गतवैभव प्राप्त होईल, असे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

 यानंतर प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शिवप्रति÷ानच्यावतीने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या शितल कोल्हापूरे यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सर्वांना दसऱयाच्या शुभेच्छा देत दौड यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देसाई यांनी केले. ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरवून दौडीची सांगता झाली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, दौडीत सहभागी झालेले शिवभक्त तसेच शिवप्रेमी मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती.

सुवर्ण सिंहासनाच्या कर्तव्य निधीला प्रतिसाद

दौडीच्या सांगता समारंभप्रसंगी सुवर्ण सिंहासनाच्या कर्तव्य निधीसाठी शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध गल्ल्यांमधील शिवभक्तांनी मोठय़ा प्रमाणात निधी दिला. नरवीर ढोल पथकातर्फे 1 लाख 111 रु., वज्रनाथ ढोल पथकाकडून 25 हजार रुपये, रमाकांत कोंडुसकर 25 हजार, माजी महापौर सरीता पाटील 11 हजार, माजी महापौर संज्योत बांदेकर 11 हजार 111 रुपयांचा निधी दिला. याशिवाय चेतन जुवेकर 3200, मधुकर बिर्जे 1111, सुनिता बेळगावकर 5001, सागर पवार 7777, सुभाष बेकर्स 2501, वैजनाथ किल्लेकर 1000, राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ, संयुक्त महाराष्ट्र चौक 11,111, विजय कुंटे 2500, चव्हाण डेअरी 2100, सतीश मुतगेकर 501 यांनी सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्यनिधी प्रतिष्ठानकडे सुपूर्द केला.

Related posts: