|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » क्रॉसिंग सुविधेसाठी घावनळे-पावशी पंचक्रोशी एकवटली

क्रॉसिंग सुविधेसाठी घावनळे-पावशी पंचक्रोशी एकवटली 

चौपदरीकरण प्लान करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार नाही : बॉक्सवेल, अंडरपास नसताना ग्रामस्थांनी जायचे कसे?

वार्ताहर / कुडाळ:

 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणात पावशी येथील घावनळे फाटा येथे क्रॉसिंगसाठी कुठल्याच सुविधेची तरतुद केली नसल्याने रविवारी सकाळी घावनळे-पावशी पंचक्रोशीतील स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ एकवटले.

 प्लान तयार करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार केला नाही. चाळीस गावांची वाहतूक असताना बॉक्सवेल, अंडरपास नाही. मग ग्रामस्थांनी जायचे कुठे?, असा संतप्त सवाल करून अधिकाऱयांना धारेवर  धरले. तुम्ही आमची मागणी वरिष्ठांना कळवा. मागणी मंजूर होईपर्यंत काम करायचे नाही. आमच्या उद्रेकाची वाट पाहू नका. काम सुरू केल्यास हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा आक्रमक पवित्रा घेतला.

 आमदार वैभव नाईक व माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी हायवे ऍथॉरिटीचे वरिष्ठ अधिकारी देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून भविष्यातील गैरसोयीकडे लक्ष वेधले. त्यांनी मागणीचे निवेदन द्या. आम्ही केंद्रस्तरावर पाठवितो, असे सांगितले. महामार्गावर घावनळे फाटय़ावर आत जाणारे पादचारी व वाहनधारकांना क्रॉसिंगसाठी प्लानमध्ये बॉक्सवेलची तरतुद केलेली नाही. यापूर्वी
ग्रामस्थांनी मागणी केली होती. मात्र, काम वेगाने सुरू असून अद्याप कुठलीच तरतूद तेथे केली नसल्याचे लक्षात येताच घावनळे-पावशी ग्रामस्थ आज एकवटले.

वैभव नाईक, पुष्पसेन सावंत यांच्यासह कुडाळ पं. स. सभापती राजन जाधव, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, माजी सरपंच पप्या तवटे व चंद्रकांत कुंभार, मुळदे सरपंच गुरुनाथ चव्हाण, तुळसुली सरपंच सुचिता तुळसुलकर, घावनळे उपसरपंच दिनेश वारंग, आंबडपाल माजी सरपंच प्रवीण वारंग, विजय वारंग, विनायक चव्हाण, बाबा वारंग, संजय पालव, रवी तुळसकर, स्वरुप वाळके, पांडू खोचरे आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ संतप्त

उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर व ठेकेदार प्रतिनिधी यादव यांना प्लानबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, तेथे बॉक्सवेल, लो व्हेईकल अंडरपास किंवा सर्कल अशी कुठलीच तरतुद नसल्याचे स्पष्ट होताच ग्रामस्थ संतप्त बनले. सततची वर्दळ सुरू असते. मग कुडाळहून येणाऱयांना पलिकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था काय आहे? असा सवाल केला.

संयुक्त बैठकीचे आश्वासन

आमदार नाईक यांनी वरिष्ठ अधिकारी देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. येथे बॉक्सवेल किंवा अंडरपास अत्यावश्यक आहे. काम सुरू आहे. पण क्रॉसिंगसाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था नाही. आपण ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ पातळीवर कळवा. आपणही पाठपुरावा करतो, असे त्यांना सांगितले. देशपांडे व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊया, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

स्थानिकांना विश्वासात न घेता प्लान

चौपदरीकरणाचा सर्व्हे करताना अधिकाऱयांनी स्थानिकांना विश्वासात न घेता प्लान तयार केला. त्यामुळे येथील भौगोलिक परिस्थिती व आतील गावांचा विचार केला नाही. याचा त्रास भविष्यात लोकांना सहन करावा लागणार आहे. कसाल, ओरोस, वेताळबांबर्डे येथेही हीच परिस्थिती आहे, याकडे पुष्पसेन सावंत यांनी देशपांडे यांचे दूरध्वनीवरून लक्ष वेधले. ग्रामस्थांचा विरोध वरिष्ठ पातळीवर कळवा. तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. ग्रामस्थांचा उद्रेक झाला, तर तुम्हाला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोक रस्ता क्रॉस कसा करणार?

जवळपास चाळीस गावांची वस्ती आहे. या जोडरस्त्याने सतत वर्दळ सुरू असते. रोज हजारो ग्रामस्थ प्रवास करतात. त्या-त्या गावात जाण्यासाठी रोजच्या 30 ते 35 बसफेऱया आहेत. कुडाळहून त्या मार्गाकडे लोक रस्ता क्रॉस कसा करणार?, असा सवाल आबा मुंज यांनी करून प्लान बनविण्याचे काम अभियंत्याचे आहे. ग्रामस्थांचे नाही. मागणी मंजूर होईपर्यंत काम बंद ठेवा. अन्यथा ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागेल, असा इशारा दिला.

आम्हाला कुठले अधिकार नाहीत!

सर्कल ठेवून तेथे सिग्नल ठेवला जाईल, असे शेडेकर यांनी सांगताच येथे पोलीस नेमणार काय? महामार्गाची वाहतूक थांबविणार का?, असा सवाल करून काही बोलू नका. आम्हाला सर्कल नको, असे ग्रामस्थांनी सांगितले. प्लाननुसार महामार्गाचे काम ठेकेदार पूर्ण करणार आहे. तुमची मागणी पाठवितो. ती मंजूर झाली, तर त्या भागाचे काम तोडले जाईल. आम्हाला कुठले अधिकार नाहीत, असे शेडेकर यांनी सांगताच ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले.

 

कुंदे येथेही काम रोखले

कुंदे : अधिकाऱयांशी चर्चा करतांना आमदार नाईक व ग्रामस्थ.

प्रतिनिधी / ओरोस:

जोपर्यंत महामार्गावर अंडर बॉक्सवेल  होत नाही तोपर्यंत काम करायला देणार नाही, अशी भूमिका कुंदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही घेतली. आमदार वैभव नाईक यांच्या मध्यस्थीने महामार्ग अधिकारी प्रकाश शेडेकर व महामार्ग अभियंता सतीश यादव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत रोष
व्यक्त केला.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गाने कसाल गावचे दोन भाग झाले आहेत. मुंबईकडे जाताना उजव्या बाजूस कसाल बालमवाडी येथून कुंदे, कुसबे, पोखरण, आंब्रड, कळसुली पुढे कणकवली, घोडगेपर्यंत जाणारे रस्ते आहेत. बालमवाडी येथे महामार्गालगत लागून प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्राथमिक शाळा आहेत. या मार्गावर दिवसरात्र एसटी बस, कार, डंपर, रिक्षा इ. वाहतूक सतत सुरू असते.

यासाठी पर्यायी व्यवस्था व्हावी, यासाठी आज कुंदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक  यांच्या मध्यस्थीने रविवारी  कसाल येथे महामार्गावर सुरू असलेले बंद पाडले. वैभव नाईक यांच्यासह कुंदे सरपंच सचिन कदम, पोखरण – कुसबे सरपंच संकेत पांगम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी प्रकाश शेडेकर  व महामार्ग अभियंता सतीश यादव यांना घेराव घालत जाब विचारला.

दोन वर्षात काम पूर्ण करणार!

आमदार नाईक यांच्यासह महामार्ग अधिकारी व ग्रामस्थ  यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी प्रकाश शेडेकर यांनी सांगितले. महामार्गावर दोन्ही बाजूंनी काम सुरू असून कामाचे आठ महिने शिल्लक आहेत. आपण लेवल क्रॉसिंग देणार आहे. बॉक्सवेलची हमी हायवे ऍथॉरिटीच्या अधिकाऱयांनी दिल्लीहून दिली तर हा प्रश्न मार्गी लागेल, असेही शेडेकर यांनी सांगितले.

यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम, पोखरण- कुसबे सरपंच संकेत पांगम, बागवे, सुशिल परब, दत्ताराम सावंत, विनोद  कदम, प्रशांत सावंत, रुपेश तायशेटे, अरुण राणे, डॉ. सूर्यकांत बालम, बाबू बालम, सत्यवान परब, गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.